सप्तशृंगी गडावरून बस ४०० फूट दरीत कोसळली

एका महिलेचा अपघातात मृत्यू

सप्तशृंगी गडावरून बस ४०० फूट दरीत कोसळली

नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे. ही बस सप्तशृंगी गडावरून बुलढाणाकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत मदत कार्यास सुरुवात केली. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सप्तश्रृंगी गडावरील घाट मार्गावर बुधवार, १२ जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस दरीत कोसळली. अपघातग्रस्त बस बुलढाण्यातील खामगाव आगाराची असून मंगळवारी सकाळी ८.३० वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. पुन्हा बुधवारी सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असताना चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गड उतरत असताना गणपती टप्प्यावरून बस खाली कोसळली असून तब्बल ४०० फूट दरीत ही बस कोसळली.

हे ही वाचा:

तुडवावा चिखल, उडवावा चिखल, फासावा चिखल चोहीकडे….

२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना

उत्तर भारतातील धुवाँधार पाऊस हा हवामान बदलाचा परिणाम नव्हे!

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात खटला चालवला जाऊ शकतो!

मृत महिलेच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत करण्यात येणार असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. तसेच अपघाताची माहिती माहिती घेतली असून संबंधित यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तशृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना, अशा भावना दादा भुसे यांनी व्यक्त केल्या.

Exit mobile version