राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू टर्किशमेड पिस्तूलातून झाडलेल्या गोळ्यांनी झाल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात उघड आहे. गुन्हे शाखेला घटनास्थळापासून काही अंतरावर सापडलेल्या बॅगमध्ये हेच पिस्तूल सापडले असून त्याआधारे गुन्ह्याचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
बाबा सिद्दीकी यांची हत्याकरण्यापूर्वी आरोपींनी कुर्ला येथे राहून बाबा सिद्दीकी यांच्या घर आणि कार्यालयांची रेकी केली होती. यासाठी वापरलेली आपाची कंपनीची दुचाकी त्यांनी याप्रकरणात अटक आरोपी प्रवीण लोणकरने हरिशकुमार निशादला पाठवलेल्या रकमेतील ३२ हजार रुपयांतून खरेदी केली होती. याच दुचाकीवरुन रेकी करताना घसरून पडल्याने सिंग, कश्यप आणि शिवा यांनी दुचाकीवरुन हल्ल्याची योजना बदलली.
हे ही वाचा :
राम गोपाल मिश्राच्या हत्येप्रकरणी मोहम्मद दानिशला अटक!
नागरिकत्व सुधारणा कायदा घटनेशी निगडीत, कलम-६ए वैध!
उत्तराखंडमधील मदरशांमध्ये मिळणार संस्कृतचे धडे
मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीची धाड, ८५ कोटींची मालमत्ता जप्त!
बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ल्याच्या दिवशी त्यांनी रिक्षाने खेरनगर गाठले. तेथे पाऊण तास वाट बघितल्यानंतर संधी मिळताच त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या दिशेने सहा गोळ्या झाडून तेथून पळ काढला. यातील तीन गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या. बॅगमध्ये सापडलेल्या टर्किशमेड पिस्तूलातूनच झाडलेल्या या गोळ्या होत्या, असे सुत्रांनी सांगितले.
आरोपींनी आपल्या सोबत प्रत्येकी एक शर्ट जादा घेतले होते. गोळ्या झाडल्यानंतर कश्यप आणि सिंग या दोघांनी शर्ट बदलले. तर, पोलिसांना बॅगमध्ये आणखी एक शर्ट आणि दुचाकी खरेदीची पावती सापडली आहे. हे शर्ट शिवाचे असल्याचे समजते. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी चार आरोपींना अटक करत ऑस्ट्रीयन ग्लॉक पिस्तूल, देशी पिस्तूल आणि टर्किशमेड पिस्तूल जप्त केली आहेत.