आज इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नढाल गावात जाऊन भेट घेत विचारपूस केली. तसंच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची सोय केलेल्या ठिकाणी जाऊन भेट देत उपलब्ध सुविधांची पाहणी केली. इर्शाळवाडी दुर्घटनेतील मुले, मुली, महिला, पुरुष, एकल स्त्रिया या सर्वांचे सर्व्हेक्षण करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची व्यवस्थित नोंद ठेवावी असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. कोणत्याही व्यक्तीसोबत गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी.असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः तत्परतेने व संवेदनशीलतेने तात्काळ भेट दिली होती. याबाबत त्यांनी सविस्तर निवेदन विधान सभेमध्ये केले होते व प्रत्येक मृत व जखमी कुटुंबाला शासनाची सर्वोतोपरी मदत जाहिर केली होती. विधानभवनात डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती ही दिली होती. या भेटी वेळी त्यांनी आपदग्रस्त लोकांना तात्काळ मदत पोहचत आहे का ? तसेच सर्व मुले व महिलांना आवश्यक सुविधा दिल्या आहेत का ? याबाबत या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचेही सांगितले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
या दरम्यान त्यांनी दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलांशी बोलताना सांगितले की, सर्वांनी एकत्रित येऊन दहा दहा लोकांचा समूह करून त्यातील एक जणाने सर्व आपदग्रस्त लोकांची जबाबदारी घ्यावी आणि काय वस्तू लागणार आहे त्याची यादी करावी व ती आम्हाला कळवावी. जेणेकरून आपण एक कुटुंब असल्यासारखं एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. तसेच गावातील स्थानिक व्यक्ती ज्याला आपण सर्व ओळखता त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी मुलांना केली. त्यांनी मुलांना लगेच कामाला न जाता शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले आणि काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याचे सांगितले. याकरिता डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचा स्वतःचा नंबर अनाथ मुलांना दिला.
हे ही वाचा:
दिल्लीतील दोन मशिदींना इशारा; अनधिकृत बांधकाम हटवा, नाहीतर कारवाई
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले बालासोर अपघाताचे कारण
विराट कोहलीची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी
महिला सुरक्षेबाबत स्वत:च्याच सरकारवर प्रश्नचिन्ह; राजस्थानच्या मंत्र्याची हकालपट्टी
माध्यमांनी ही घटना ताबडतोब दाखवली त्यामुळे ती सर्वांपर्यंत आली. त्याबद्दल त्यांनी माध्यमांचे आभार मानले. येथील परिस्थितीचा प्रत्येक महिन्याला आढावा घेतला जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. समाजातून जी मदत इथे आली आहे त्या मदतीचे नीट वाटप होणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे असे डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केली. त्यांनी येथे असलेल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यांचे सांत्वन करत धीर दिला. इर्शाळवाडीतील नागरिकांचे सरकारकडून लवकर पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील खालापूरमधल्या इर्शाळवाडी गावात गुरुवारी दरड कोसळल्याची दुदैवी घटना घडली आहे. सध्या येथील नागरिकांना, अनाथ मुलांना जवळच्या नढाल गावात स्थलांतरित केले आहे. दरम्यान, ही घटना घडल्यापासून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या अधिवेशनात असतानाही संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होत्या. अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडून आढावा घेत त्यांना योग्य त्या सूचना देत होत्या.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या मार्फत सर्व मुलांचं पालकत्व स्वीकारण्यात येणार असून त्याद्वारे त्यांना मदत करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.यावेळी आमदार महेंद्र थोरवे, आमदार मनिषा कायंदे शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदी उपस्थित होते.