दिल्लीतील मेहरौली भागातील ७०० वर्षे जुनी मशीद जमीनदोस्त करण्यात आली आहे.दिल्ली विकास प्राधिकरणाच्या पथकाकडून (डीडीए) ही कारवाई करण्यात आली आहे.मात्र, दिल्ली सल्तनत रजिया सुलतानच्या काळात बांधलेली ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची वास्तू पाडल्यानंतर चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.डीडीएच्या कारवाईमुळे स्थानिक लोक नाराज झाले असून कोणतीही पूर्वसूचना न देता मशीद पाडण्यात आल्याचा आरोप लोकांनी केला आहे.
‘न्यूज १८ हिंदी’च्या बातमीनुसार, अखुंदजी असे पाडण्यात आलेल्या मशिदीचे नाव असून या मशिदीचे मौलवी मोहम्मद झाकीर हुसेन हे आहेत. मौलवी मोहम्मद झाकीर हुसेन म्हणाले की, कोणतीही पूर्व माहिती आणि सूचना न देता डीडीए पथक आले आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पहाटे ५:३० वाजेपर्यंत मशीद रिकामी करण्यास सांगितले.ते पुढे म्हणाले की, या मशिदीत एक मदरसाही सुरू होता, ज्यामध्ये १५ विद्यार्थी राहत होते. वास्तविक, मशिदीत सुरू असलेल्या मदरशात एकूण २२ मुले शिक्षण घेत होते.मशीद पाडल्यानंतर अधिकाऱ्यांनी ताबडतोब मशिदीचा मलबा ट्रकमध्ये भरला आणि तेथून निघून गेले.मशीद जमीनदोस्त केल्यानंतर अगदी थोड्या वेळात मातीचा ढिगारा हटवण्यात आला, असे मौलवी मोहम्मद झाकीर हुसेन यांनी सांगितले.
हे ही वाचा:
समान नागरी कायदा विधेयक उत्तराखंड विधानसभेत मंजूर
‘श्रीकृष्णाने पाच गावे मागितली होती, आम्ही तीन मागतो’
अमेरिकेचा बगदादमध्ये ड्रोनहल्ला इराणसमर्थक दहशतवादी कमांडरसह तिघांचा मृत्यू
मिलिंद देवरांनंतर बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामाराम
मशिदीत मुलांना शिकवणारे मोहम्मद जावेद यांनी बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकावर गंभीर आरोप केले. ‘द हिंदू’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला होता.त्यांना तेथून ताबडतोब निघून जाण्यास सांगण्यात आले. मशीद आणि मदरशात ठेवलेल्या वस्तूही नेण्यास परवानगी दिली नाही.लहान मुलांची पुस्तकेही मशिदीत राहिल्याचे त्यांनी सांगितले.तसेच पथकाच्या कारवाईमुळे मशिदीत शिकणाऱ्या मुलांना दुसऱ्या मदरशात हलवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणावर डीडीएने आपली बाजू मांडली.अधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिक्रमण हटाव मोहिमेचा एक भाग असल्याने ही कारवाई करण्यात आली.डीडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘संजय वन'( जंगल वनक्षेत्र) परिसरातील आसपासचे अतिक्रमण हटवण्याचे आदेश रिज मॅनेजमेंट बोर्डाने दिले होते.ही मशीद संजय वनच्या आरक्षित वनजमिनीवर उभी असल्याने ती बेकायदेशीर आहे.अखुंदजी मशीद बेकायदेशीर असल्याने कारवाई करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.