आंध्र प्रदेशमध्ये २९ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन पॅसेंजर ट्रेनची धडक होऊन अपघातामध्ये १४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचे कारण आता समोर आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातासंदर्भात माहिती देताना धक्कादायक खुलासा केला आहे. आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यातील कंटकपल्ली येथे हावडा-चेन्नई रेल्वे लाईनवर रायगड पॅसेंजर ट्रेनने विशाखापट्टनम पलासा ट्रेनला मागून धडक दिली होती. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला, ज्यामध्ये ५० हून अधिक प्रवाशी जखमी झाले होते.
अपघातग्रस्त पॅसेंजर ट्रेनचा चालक आणि सहचालक हे अपघात होण्यापूर्वी मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे नवीन सुरक्षा उपायांवर काम करत आहे. त्याबद्दल माहिती देत असताना मंत्री वैष्णव यांनी आंध्रप्रदेशमध्ये मागच्यावर्षी घडलेल्या अपघाताचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “आंध्र प्रदेशमध्ये जो अपघात घडला त्याच्यामागे कारण असे की, लोको पायलट आणि सह-पायलट दोघेही मोबाईलवर क्रिकेटचा सामना पाहत होते, म्हणून त्यांचे लक्ष विचलित झाले. मात्र, रेल्वेमध्ये आता आम्ही अशी प्रणाली बसवत आहोत, ज्यामुळे अशा चुकांचा आम्ही शोध घेऊ शकू. पायलट आणि सह-पायलट दोघेही फक्त रेल्वे चालविण्यावरच लक्ष केंद्रीत करतील, यावर यापुढच्या काळात अधिक भर दिला जाणार आहे.”
हे ही वाचा:
… अन् मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांत तरळले अश्रू
‘सीमा मर्यादा कराराचे चीनने पालन करणे आवश्यक’
पाकिस्तानमध्ये आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची हत्या
वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर
अश्विनी वैष्णव असेही म्हणाले की, “सुरक्षेवर अधिक भर देण्यात येत असून प्रत्येक अपघातानंतर खोलात जाऊन त्याची चौकशी केली जात आहे. अपघाताचे कारण शोधल्यानंतर पुढच्यावेळेस या कारणामुळे अपघात होऊ नये, यासाठी उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.”