कारकिर्दीतला १००वा कसोटी सामना खेळण्यास सज्ज असलेल्या गोलंदाज अश्विन याने इंग्लंडविरोधातील सन २०१२च्या मालिकेला आयुष्याला कलाटणी देणारा क्षण संबोधले आहे. या मालिकेमुळे मला स्वतःच्या चुका ओळखण्यास आणि माझ्यात सुधारणा करण्यास मदत मिळाली, असे अश्विन याने सांगितले आहे.
इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ३-१ने आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्यात भारताने बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाला पाच विकेटने पराभूत केले. आता भारताचे डोळे पाचव्या कसोटीकडे लागले आहेत. धर्मशालामध्ये गुरुवारपासून खेळला जाणारा सामना भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन याच्यासाठीही खास आहे. त्याचा हा १००वा कसोटी सामना असेल.
हे ही वाचा :
ओडिशात भाजप-बिजू जनता दलाची आघाडी?
शेख शाहजहान याला सीबीआयकडे सोपवण्यास प. बंगालचा नकार
भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो सुरू!
२०२३ च्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या अप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ
या पार्श्वभूमीवर अश्विन याने मंगळवारी पत्रकारांशी वार्तालाप केला. ‘सन २०१२ची इंग्लंडविरुद्धची मालिका माझ्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. मला माझ्यात सुधारणा करायची आहे, हे मला या मालिकेने दाखवून दिले,’ असे अश्विनने सांगितले. १००व्या कसोटी सामन्याबाबत त्याला विचारले असता, ‘ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. मात्र मी माझ्या तयारीत काही बदल केलेला नाही. आम्हाला हा कसोटी सामना जिंकायचा आहे,’ असे अश्विनने यावेळी सांगितले.
कसोटी सामन्यांत ५०० विकेट
सन २०११मध्ये भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अश्विन याने राजकोट येथील सामन्यादरम्यान ५०० कसोटी विकेटचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. याआधी माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी अशी कामगिरी केली होती. त्यांच्या नावावर १३२ कसोटी सामन्यांत ६१९ विकेट आहेत.