नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच एनसीईआरटीने सहावीच्या पुस्तकातून ब्राह्मण समाजाबद्दलचे जे संशयास्पद दावे आहेत ते काढून टाकले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक पांडे यांनी स्वायत्त सरकारी संस्थेकडे या बद्दल विचारणा केल्यानंतर हे दावे काढून टाकण्यात आले आहेत.
एनसीईआरटीने आरटीआय प्रश्नाच्या उत्तरात कबूल केले की, हिंदू पुजारी लोकांना वर्णांमध्ये विभाजित करतात आणि स्त्रिया आणि शूद्रांना वेदांचा अभ्यास करण्याची परवानगी नाही या दाव्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. या पुस्तकामध्ये हिंदू पुजारी (ब्राह्मणांनी) लोकांना वर्ण नावाच्या गटांमध्ये विभागले आणि वर्ण जन्माने ठरवले जातात, असा दावा केल्याचे म्हटले होते.
विवेक पांडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना एनसीईआरटीच्या सामाजिक विज्ञान विभागाच्या प्रा. गौरी श्रीवास्तव यांनी सहावीच्या पाठ्यपुस्तकातील विवादास्पद भाग काढून टाकण्यात येईल असे सांगितले होते. पांडे यांनी ज्या विधानांसाठी पुरावे मागितले आहेत, ते पुढील शैक्षणिक सत्रापासून सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातील भाग असणार नाहीत, असे माहिती अधिकारातील उत्तरात म्हटले आहे.