पहलगाम हल्ला: आतापर्यंत ९ दहशतवाद्यांची घरे उध्वस्त!

सुरक्षा दलाची कारवाई सुरूच

पहलगाम हल्ला: आतापर्यंत ९ दहशतवाद्यांची घरे उध्वस्त!

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली आहे. २०१६ पासून सक्रिय असलेला दहशतवादी जमील अहमद शीर गोजरी याचे बांदीपोरा येथील घर पाडण्यात आले आहे. आतापर्यंत, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या साथीदारांची ९ घरे उद्ध्वस्त केली आहेत. सुरक्षा दलांकडून कारवाई सुरूच आहे.

बांदीपोराच्या नाझ कॉलनीतील सक्रिय दहशतवादी जमील अहमद शिर गोजरी याचे दुमजली घर सुरक्षा दलांनी पाडले. यापूर्वी, लष्कर-ए-तैयबाचा (एलईटी) दहशतवादी आदिल ठोकर, ज्याला आदिल गुरे म्हणूनही ओळखले जाते, त्याचे घरही पाडण्यात आले आहे.

दहशतवादी आदिल गुरे हा अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा ब्लॉकमधील गुरे गावचा रहिवासी आहे. दहशतवादी आदिलला मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे. अनंतनाग पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आदिलबद्दल माहिती देणाऱ्या कोणालाही हे बक्षीस मिळेल, असे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणात दोन पाकिस्तानी नागरिकांनाही मोस्ट वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बांदीपोरा, पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात तीन सक्रिय दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली. रात्री उशिरा, शोपियान जिल्ह्यातील वांडीना येथील दहशतवादी अदनान शफीचे घर पाडण्यात आले. दहशतवादी अदनान शफी हा गेल्या वर्षी दहशतवादी गटात सामील झाला होता. पुलवामा जिल्ह्यात आणखी एक सक्रिय दहशतवादी आमिर नझीर याचे घरही उद्ध्वस्त करण्यात आले.

107 पाकिस्तानी गायब, आपण त्यांना पाहिलत का? | Amit Kale | Pakistani Immigrants | Devendra Fadnavis |

दरम्यान, पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतीय लष्कर हाय अलर्टवर आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर अनेक शोध मोहिमा राबवत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. देशभरात निदर्शने होत आहेत आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
Exit mobile version