क्रिकेटमधील दोन महान खेळाडू – सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा रविवार, १७ मार्च रोजी आमने-सामने भिडताना दिसतील. रायपूरच्या एसव्हीएनएस स्टेडियमवर इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी रंगतदार लढत होणार आहे. या सामन्यात इंडिया मास्टर्स आणि वेस्टइंडीज मास्टर्स आमनेसामने भिडतील.
स्पर्धेपूर्वीच विजेतेपदाचे प्रमुख दावेदार मानल्या गेलेल्या इंडिया मास्टर्स संघाने जवळपास चमकदार कामगिरी केली आहे. गट फेरीत त्यांना ऑस्ट्रेलिया मास्टर्स संघाकडून एकमेव पराभव पत्करावा लागला होता. मात्र, सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील या संघाने त्या पराभवाचा वचपा काढला आणि गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत शेन वॉटसनच्या ऑस्ट्रेलिया मास्टर्स संघावर मोठा विजय मिळवत त्यांना लोळवत अंतिम फेरीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला.
इंडिया मास्टर्सचा प्रवास:
- श्रीलंका मास्टर्स विरुद्ध ४ धावांनी विजय
- इंग्लंड मास्टर्स विरुद्ध ९ विकेट्सनी विजय
- दक्षिण आफ्रिका मास्टर्स विरुद्ध ८ विकेट्सनी विजय
- ऑस्ट्रेलिया मास्टर्स संघाकडून पराभव
- वेस्टइंडीज मास्टर्स विरुद्ध ७ धावांनी विजय
- उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया मास्टर्स विरुद्ध ९४ धावांनी विजय
दुसरीकडे, वेस्टइंडीज मास्टर्स संघाने देखील शानदार सुरुवात करत ऑस्ट्रेलिया मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स संघांविरुद्ध सलग दोन विजय मिळवले. मात्र, त्यानंतर श्रीलंका मास्टर्स आणि इंडिया मास्टर्सकडून पराभव पत्करल्यानंतर त्यांचा गट टप्प्यातील प्रवास काहीसा अडखळला. मात्र, दक्षिण आफ्रिका मास्टर्स संघावर २९ धावांनी महत्त्वाचा विजय मिळवत त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
हेही वाचा :
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा हल्ला; अनेक जवान मारल्याचा दावा!
औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल!
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये राबवली स्वच्छता मोहीम
आयपीएलच्या काही सामन्यांमधून बुमराह आऊट
वेस्टइंडीज मास्टर्सचा प्रवास:
- ऑस्ट्रेलिया मास्टर्स विरुद्ध विजय
- इंग्लंड मास्टर्स विरुद्ध विजय
- श्रीलंका मास्टर्स विरुद्ध पराभव
- इंडिया मास्टर्स विरुद्ध पराभव
- दक्षिण आफ्रिका मास्टर्स विरुद्ध २९ धावांनी विजय
- उपांत्य फेरीत श्रीलंका मास्टर्स विरुद्ध ६ धावांनी विजय
अंतिम सामन्यात क्रिकेटप्रेमींना दोन महान फलंदाज – तेंडुलकर आणि लारा यांच्यात थरारक द्वंद्व पाहायला मिळणार आहे. गट फेरीत तेंडुलकरने विश्रांती घेतल्यामुळे हे द्वंद्व पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे आता हा अंतिम सामना चाहत्यांसाठी खास ठरणार आहे.
हा थरारक सामना कलर्स सिनेप्लेक्स, कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्स या वाहिन्यांवर तसेच जिओ सिनेमा आणि हॉटस्टारवर संध्याकाळी ७ वाजता थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.