भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) पेंग्विन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. या पेंग्विनची देखभाल करण्यासाठी पुन्हा ‘हाय- वे’ कंस्ट्रक्शन या कंपनीचीच वर्णी लागली आहे. महापालिकेने या कंपनीचे आधीचे कंत्राट संपण्याच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन वर्षांसाठी कंत्राट कामाच्या निविदा काढल्या होत्या. मात्र, पुन्हा या कामांसाठी ‘हाय वे’ कंस्ट्रक्शन कंपनीचीच निवड करण्यात आली आहे. या कंपनीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी १५ कोटी २६ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
कंत्राटाची मुदत ही ३० सप्टेंबर २०२१ ला संपली मात्र, नव्या कंत्राटाची नियुक्ती न झाल्यामुळे याच कंपनीला ४३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. यासाठी पालिकेने तब्बल ४५ लाख ८४ हजार ३६७ रुपये पालिकेने मोजले आहेत.
पेंग्विन देखभालीच्या कंत्राटावरून विरोधी पक्षाने यापूर्वीही सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली होती. तीन वर्षांपूर्वी याच कालावधीच्या कंत्राटासाठी रु. १० कोटीचे अधिदान केले होते. मग आता सर्वत्र आर्थिक मंदी असताना या कंत्राटाच्या किंमतीमध्ये ५० % वाढ कशी काय झाली? असा सवाल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
खड्ड्यांमुळे रायफलमधून गोळी सुटली आणि जवानाचा गेला प्राण
छत्तीसगडमध्ये १२०० जणांनी केला हिंदू धर्मात प्रवेश
शिवचरित्र हा श्वास, राष्ट्रनिर्मितीचा ध्यास
अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनामुळे निधन
राणीच्याबागेत २०१७ मध्ये पेंग्वीन कक्ष सुरु करण्यात आल्यानंतर त्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने महापालिकेने तीन वर्षांसाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती. या तीन वर्षांकरता कंपनीला सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च आला होता. परंतु हा कालावधी संपुष्टात आल्याने पुढील तीन वर्षांकरता नव्याने निविदा मागवण्यात आल्या होत्या. तीनही वेळा कंत्राटदारांकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे आणि या निविदेमध्ये एकच निविदा प्राप्त झाल्याने या एकमेव ‘हाय वे’ कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
नव्या कंत्राटाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत चर्चेला येणार असून यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.