आज देशभर घटस्थापनेचा उत्साह दिसून येत आहे. पण महाराष्ट्रात मात्र भाविकांमधला उत्साह जरा जास्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आजपासून महाराष्ट्रातील हिंदू धर्मीयांची सर्व मंदिरे आणि इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे ही भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या कारणास्तव गेले अनेक महिने राज्यातील मंदिरांना टाळे ठोकण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने ७ ऑक्टोबर पासून राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याची घोषणा केली. त्यानुसार आजपासून राज्यातील सर्व मंदिरे ही भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?
‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा भाजपाच नंबर १
मंदिरे खुली झाल्याने देवाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी सर्व भाविकही सकाळपासूनच मंदिरात जाताना दिसून आले. राज्यातील पंढरपूर, तुळजापूर, शिर्डी, कोल्हापूर, वणी, जेजुरी, दादरचा सिद्धिविनायक, पुण्याचा दगडूशेठ हलवाई अशा सर्व मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
मंदिरे खुली झाल्यामुळे राज्यातील एका मोठ्या घटकाची उपजीविका पुन्हा एकदा सुरू होणार आहे. राज्यातील अनेक फुल विक्रेते, हार विक्रेते, प्रसाद विक्रेते, अगरबत्ती विक्रेते असा एक मोठा वर्ग उपजीविकेसाठी मंदिरांवर अवलंबून असतो. गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद असल्यामुळे या वर्गाची उपजीविका बंद पडली होती. राज्य सरकारकडूनही त्यांना कोणताही दिलासा देण्यात आला नव्हता. पण आता राज्यातील मंदिरे सुरू झाल्यामुळे या वर्गाची उपजीविका पुन्हा एकदा सुरू होणार आहे.