अयोद्धेत उभारण्यात येणारे भव्य राम मंदीर ही शतकातून घडणारी एकांडी घटना आहे. सर्वसामान्य जनता या समर्पण यज्ञात भरभरून योगदान देत असताना उद्योजकही मागे राहणार नाहीत, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक प्रशांत कारूळकर यांनी केले आहे.
राम जन्मभूमी आंदोलनाचे खंदे समर्थक असलेल्या प्रशांत कारूळकर यांनी संघ विचार मांडणा-या साप्ताहीक विवेकच्या ‘राम मंदीर ते राष्ट्रमंदीर’ या ग्रंथासाठी भरीव योगदान दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या या ग्रंथात कारुळकर यांचा लेखही प्रसिद्ध झाला आहे.
राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने देशातील जनतेला योगदानासाठी आवाहन करण्यात आले आहे. वाळू निर्मिती, शेअर मार्केट, बांधकाम, फायनान्स, विमा अशा अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या कारुळकर यांचा कॉर्पोरेट विश्वात यांचा चांगलाच दबदबा आहे. ‘अयोद्धेतील राम मंदीर निर्माण ही ऐतिहासिक घटना असून या समर्पण यज्ञात मागे राहू नका’, असे आवाहन त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांचे मित्र आणि सहका-यांना केले आहे.
‘राम मंदीराबाबत जेव्हा माझी कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांशी भेट झाली तेव्हा अनेकांना या कामासाठी काही तरी भरीव योगदान देण्याची इच्छा असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्यांना फक्त या अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे’, असे प्रशांत कारुळकर यांनी सांगितले.
‘राम मंदीरासाठी एक मोठा निधी उभा करून तो एकत्रित पणे अर्पण करावा असा आमचा मानस आहे’, असे ते म्हणाले.