तेलंगणा सरकारचे मुस्लिम लांगुलचालन, रमजानसाठी कर्मचाऱ्यांना कामातून सूट!
भाजपाकडून जोरदार टीका
Team News Danka
Published on: Tue 18th February 2025, 05:54 PM
रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने एक मोठा निर्णय घेतला. रेवंत रेड्डी सरकारकडून संपूर्ण रमजान महिन्यात राज्यातील सर्व मुस्लिम सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विशेष सूट देण्यात आली आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर भाजपाकडून टीका केली जात आहे.
सरकारी आदेशानुसार, या कर्मचाऱ्यांना २ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत दुपारी ४ वाजेपर्यंत काम करण्याचे सांगण्यात आले आहे. ४ नंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे. तथापि, जर कोणत्याही कर्मचाऱ्याचे काम जास्त आवश्यक असेल तर त्याला कार्यालयातच राहावे लागेल, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तेलंगणाच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांनी हा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय तापमान वाढले असून भाजपने या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
भाजप नेते अमित मालवीय यांनी या आदेशाला मुस्लिम समुदायाला खुश करण्याचा प्रयत्न म्हटले. ते म्हणाले की, नवरात्रीसारख्या हिंदू सणांमध्ये हिंदू कर्मचाऱ्यांना अशी कोणतीही सूट मिळत नाही. अमित मालवीय यांनी विरोध दर्शवत याला व्होट बँकेचे राजकारण म्हटले. त्याच वेळी, भाजपचे ज्येष्ठ नेते पी मुरलीधर राव यांनीही मुख्यमंत्र्यांवर आरोप केले की ते समाजातील एका घटकाला प्राधान्य देत आहेत.
तेलंगणातील भाजपाचे आमदार टी. राजा सिंह यांनीही संताप व्यक्त केला. ते म्हणाले, हिंदूंच्या सणांवेळी सरकारकडून असे कोणतेच निवेदन निघाले नाही. नवरात्री, शिवरात्री, हनुमान जयंती, राम नवमी सारख्या अनेक हिंदू उत्सवाला अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी देखील तेलंगातील हिंदू विरोधी काँग्रेस सरकार कोणतीच सुविधा दिली नाही, देत नाही. मात्र, रमजानमध्ये मुस्लिमांसाठी त्यांच्या कामाच्या वेळेत कपात केली आहे.
ते पुढे म्हणाले, तेलंगणातील जनतेने हे पाहावे. एक केसीआर होते, ज्यांना आम्ही आठवा निजाम म्हणत होतो. परंतु, रेवंत रेड्डींच्या रूपाने नववा निजाम जन्माला आला आहे, तेलंगणाचे हे दुर्भाग्य आहे. ते पुढे म्हणाले, तेलंगाना किंवा कर्नाटक सारख्या ज्या-ज्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार बनते त्याठिकाणी मुस्लिमांसाठी असे निवेदन निघतात.