एकदिवसीय मालिकेच्या पाठोपाठच भारतीय संघाने टी-२० मालिकेतही वेस्ट इंडीज संघाचा धुव्वा उडवला आहे. ३-० अशी मालिका खिशात घालत भारताने वेस्ट इंडीजला व्हाईटवॉश दिला आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी आधीच घेतली होती. त्यात काल 20 फेब्रुवारी रोजी ईडन गार्डन्स येथे पार पडलेला तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून भारताने व्हाईट वॉश सुनिश्चित केला आहे.
कालच्या सामन्यात भारतीय संघ चार बदलांसह मैदानात उतरला. ऋतुराज गायकवाड, आवेश खान, शार्दुल ठाकूर आणि श्रेयस अय्यर या चौघांना खेळण्याची संधी देण्यात आली. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी कर्णधार रोहित शर्माने ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांना सलामीसाठी पाठवले आणि स्वतः फलंदाजीसाठी खालच्या क्रमांकावर येण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यात अडकणाऱ्या ईशान किशनला तिसऱ्या सामन्यात सूर गवसला सारखा वाटला. त्याने ३४ धावा केल्या पण ऋतुराज गायकवाड मात्र अवघ्या चार धावातच माघारी परतला.
हे ही वाचा:
न्यायालयाच्या बाहेर वाहनांमध्ये बसून नोटरी व्यवसाय नको!
मिठागराच्या जमिनीवर सेना आमदार उभारणार थीम पार्क?
मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रश्न ‘केंद्र’स्थानी
ठाकरे-राव भेट! तिसऱ्या आघडीच्या उचक्या पुन्हा सुरु
त्यानंतर श्रेयस अय्यरने २५ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव व्यंकटेश अय्यर या जोडीने पुन्हा आपली जादू दाखवली. यादवने ६५ धावा करत अर्धशतक साजरे केले. तर व्यंकटेशने नाबाद ३५ धावा केल्या. या जोरावर भारतीय संघाने १८४ धावा केल्या. वेस्ट इंडीज संघ हे आवाहन पूर्ण करताना अपयशी ठरला. निकोलस पुरनच्या ६१ धावांचा अपवाद वगळता एकही खेळाडू चमक दाखवू शकला नाही आणि भारताने हा सामना १७ धावांनी जिंकला.
या विजयानंतर भारतीय संघ जगातील क्रमांक १ चा टी२० संघ ठरला आहे. या मालिकेतील सादरीकरणासाठी सूर्यकुमार यादव याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.