भारतीय क्रिकेट संघ मागील काही वर्षांपासून उत्तम कामगिरी करत आहे. मात्र तरी स्पर्धेच्या मोक्याच्या काही सामन्यांत भारतीय खेळाडूंचा खेळ कमी पडतो ज्यामुळे एकही आयसीसी चषक भारताला मिळालेला नाही. त्यामुळे आगामी टी २० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ व्यवस्थापनात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या जागी माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची वर्णी लागू शकते. नॅशनल क्रिकेट अकॅडमी सोबतचा द्रविडचा करार नुकताच संपला असल्याने तो आता मुख्य प्रशिक्षकाच्या पदासाठी प्रयत्न करु शकतो आणि त्याची श्रीलंका दौऱ्यातील कामगिरी पाहता त्याला हे पद मिळू देखील शकते, अशा एक न अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
मागील काही वर्षांत भारतीय संघात युवा खेळाडूंच्या आगमनामुळे एक नवा जोश जन्माला आल्याचं दिसत आहे. भारतीय क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल असल्याचं या खेळाडूंचा खेळ पाहून वाटतं. भारताची पूर्वीपासूनची कमजोरी असणारी वेगवान गोलंदाजीची कसरही युवा खेळाडू मोहम्मद सिराज, टी नटराजन, नवदीप सैनी यांनी भरुन काढली आहे. तसेच शार्दूल ठाकूर, दिपक चहार सारखे अष्टपैलूही भारतीय संघात आले आहेत. या सर्व तरुण हिऱ्यांना तराशणारा राहुल द्रविडच आहे. राहुल भारताच्या अंडर-१९ आणि भारत ए संघाचा प्रशिक्षक असल्याने या सर्व नवख्या खेळाडूंसोबत बऱ्याच काळापासून काम करत आहे. तसेच नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा प्रमुख असताना त्याचं कामच नव्या खेळाडूंची निवड करण्याचं असल्याने त्याने ही कामगिरी चोख पार पाडली आहे. ज्यामुळे आता त्याला मुख्य प्रशिक्षक बनवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
हे ही वाचा:
हेलिकॉप्टरचा पंखा लागून पायलटचा मृत्यू
राज्यपालांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
विनेश फोगाटवर केली ‘ही’ मोठी कारवाई
श्रीलंका येथे सहा सामन्यांसाठी प्रशिक्षक असणाऱ्या राहुलला मुख्य कोच होण्याबद्दल विचारले असता, त्याने त्या गोष्टीत अधिक रस दाखवला नाही. तो म्हणाला, ‘खरं सांगू तर मी आता जे करतो आहे, त्यात मला मजा येत आहे. त्यामुळे मी पुढील विचार तूर्तास तरी केलेला नाही.’