विश्वचषक तिसऱ्यांदा उंचावण्याचे भारताचे स्वप्न रविवारी धुळीला मिळाले. ऑस्ट्रेलियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच बाबतीत सरस खेळ करून भारताच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला. मात्र असे असले तरी भारताचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले आहे.
‘रोहितने कर्णधार म्हणून विलक्षण कामगिरी केली. तो ड्रेसिंग रूममध्ये संवाद साधण्यासाठी नेहमीच तयार असायचा. या लढतींसाठी त्याने खूप वेळ आणि ऊर्जा दिली. त्याने त्याच्या फलंदाजीतूनही संघासाठी योगदान दिले,’ असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हे ही वाचा:
गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाखाली सापडला ५५ मिटरचा बोगदा
भारताचे एकच सामना गमावला, तीही ‘फायनल’, ऑस्ट्रेलियाला सहावे विश्वविजेतेपद
‘हिंदू असल्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरू शकलो’
भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?
द्रविड यांनी संघातील खेळाडूंप्रति सहानुभूती व्यक्त केली आणि अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेले योगदान आणि प्रयत्नांचे कौतुक केले.‘आपल्या संघाची निराशा झाली आहे. ड्रेसिंग रूममध्ये विविध भावनांचा पूर दाटून आला आहे. त्यांनी दिलेले योगदान आणि प्रयत्न बघितल्यानंतर एक प्रशिक्षक म्हणून त्यांना असे बघणे मला अवघड गेले. मात्र उद्याचा सूर्योदय होईल, तेव्हा आम्ही या पराभवातूनही बरेच काही शिकू. तुम्ही अशा अवघड सामन्यांचा जोपर्यंत सामना करत नाही, तोपर्यंत तुम्ही अधिक उंची गाठू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया द्रविड यांनी दिली.
द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. मात्र ते भविष्याचा विचार करत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मी भविष्याचा विचार केलेला नाही. याबाबत विचार करायला वेळच मिळालेला नाही. जेव्हा मला वेळ मिळेल, तेव्हा मी नक्कीच विचार करेन. मी केवळ विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले होते,’ असे द्रविड यांनी स्पष्ट केले.