शिक्षणसेवकांचा एल्गार; मानधन कधी मिळणार?

शिक्षणसेवकांचा एल्गार; मानधन कधी मिळणार?

महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरती केलेल्या काही शिक्षकसेवकांना गेल्या जवळपास वर्षभरापासून मानधनच मिळालेले नाही. आधीच तुटपुंजे मानधन त्यात त्याचीही वानवा अशा परिस्थितीत विविध जिल्ह्यातील शिक्षणसेवक हालाखीचे जीवन जगत आहेत. हे मानधन दिले गेले नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचे पाऊल उचलण्याचा इशारा शिक्षणसेवक संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी राबविलेल्या शिक्षकभरतीच्या प्रक्रियेनुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना प्रतिमहिना ८ हजार रु. या मानधनावर तीन वर्षे काम केल्यानंतर नियमित वेतन लागू होते. या तुटपुंज्या मानधनावर फेब्रुवारी २०२० ला नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आदि जिल्ह्यात नियुक्त झालेले अनेक शिक्षणसेवक थकित वेतनाअभावी अडचणीत सापडले आहेत. कोरोना ड्युटी करावी लागत असताना त्यांना विमाकवच नाही की वैद्यकीय सुविधा नाही. हक्काचे वेतन गेल्या १० ते ११ महिन्यांपासून थकित ठेवले आहे.

हे ही वाचा:

स्पुतनिक लस पुढील आठवड्यापासून खुल्या बाजार मिळणार

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढणार?

भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले

टेंडर के आगे जित है

नाशिक मध्ये तर उच्च माध्यमिकला शिकवणाऱ्या शिक्षणसेवकांचा वेतनासाठी आवश्यक असलेला शालार्थ आयडी अधीक्षक वेतन पथक माध्यमिक विभाग यांनी गेल्या चार महिन्यापासून अडवून ठेवला आहे. अहमदनगर येथील ७० ते ८० शिक्षणसेवकांचे दहा महिन्यापेक्षा अधिकचे वेतन माध्यमिक विभागाने शासनाचा कुठलाच लिखित आदेश नसताना थकले आहे. म्हणूनच संचालक कार्यालय, पुणे आणि विभागीय उपसंचालक कार्यालय, नाशिक यांना इशारा देण्यात आला आहे की, येत्या तीन आठवड्यात शिक्षणसेवकांचे थकित वेतन जमा न केल्यास संघटना राज्यव्यापी बेमुदत आंदोलन हाती घेईल. डी.एड, बी.एड, स्टुडन्ट असोसिएशन संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. राम जाधव यांनी ‘न्यूज डंका’शी संवाद साधला आणि शिक्षकसेवकांची अवस्था कथन केली. कोरोनाच्या संकटकाळातही हे शिक्षण सेवक काम करीत आहेत, पण त्यांच्या मानधनाची सरकारला चिंता नाही. या कठीण परिस्थितीला त्यांनी कसे तोंड द्यावे.

म्हणूनच डी.एड, बी.एड, स्टुडन्ट असोसिएशन संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, उपाध्यक्ष संदीप कांबळे,  उपाध्यक्षा अर्चना सानप, राज्य सचिव प्रशांत शिंदे, राज्य सरचिटणीस प्रा. राम जाधव, राज्य संघटक प्रा. वैभव फटांगरे, राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. वैभव गरड, तुषार देशमुख आदि पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. सदर आंदोलनाला ‘अखिल महाराष्ट्रीय नेट, सेट, बी. एड, डी. एड पात्रता धारक संघटना, महाराष्ट्र राज्य, ‘रयत सेवक मित्र मंडळ सातारा’, पवित्र पोर्टल असोसिएशन, म. न. पा. पुणे आदि संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे.

Exit mobile version