राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

कोरोनाच्या महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. कोरोनामुळे ठप्प झालेले जीवन सुरळीत होत असताना गेल्या दोन वर्षाचे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार अजूनही देण्यात आलेले नाहीत. शिक्षण क्षेत्र विस्कळीत झाले असतानाही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोरोना काळात शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया पूर्ण करून पुरस्कार जाहीर केले. राज्य शिक्षण विभागाला या पुरस्काराचा विसर पडलेला दिसून येत आहे; त्यामुळे दोन वर्षांचे पुरस्कार प्रलंबित आहेत.

आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागवले जातात. त्यानंतर त्या प्रस्तावांची छाननी, मुलाखती अशा प्रक्रिया पार पाडून पुरस्कार विजेत्या शिक्षकांची नावे जाहीर केली जातात. विजेत्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या दिवशी पुरस्कार देण्यात येतात. मात्र कोरोना काळात ही प्रक्रियाच राज्य शिक्षण विभागाने राबवली नसल्यामुळे गेल्या वर्षीची आणि यंदाच्या वर्षीची अशा दोन्ही वर्षांच्या प्रक्रिया प्रलंबित आहेत.

हे ही वाचा:

नाटकाचा पडदा उघडण्यासाठी रंगकर्मी करणार नटराजाची आरती

आम्ही भरणार नाही गणेशमंडपाचे शुल्क! वाचा, कुणी दिला इशारा…

ज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे निधन

२०५० मध्ये मुंबई बुडणार? मंत्रालय, नरिमन पॉइंट जाणार पाण्याखाली

केंद्रीय शिक्षण विभागाने प्रक्रियेत बदल करून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन घेऊन शिक्षकांसाठी पुरस्कार जाहीर केले. मात्र राज्य शिक्षण विभागाने असे का केले नाही, कोरोना काळात शिक्षक अथकपणे काम करत असताना त्यांना पुरस्कारापासून वंचित का ठेवले जात आहे, असे प्रश्नही विचारले जात आहेत. काही जिल्हा परिषदांनी पुरस्काराची प्रक्रिया राबवली आहे, असे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेले विक्रम अडसूळ यांनी सांगितले.

राज्य शिक्षक पुरस्कारांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणे शिक्षण विभागाला शक्य होते. पण ही प्रक्रिया दोन वर्षे न राबवण्यामागे राज्याच्या शिक्षण विभागाची अनास्था कारणीभूत आहे का, असा प्रश्न पडला पडतो, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी मांडले आहे. राज्य शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, असे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Exit mobile version