महाराष्ट्रात सगळीकडे ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहेत. पण पुण्यात तसे आदेश निघाले नव्हते अखेर पुण्यातही ४ ऑक्टोबरला शाळा सुरू होणार असल्या तरी शिक्षकांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.
पुण्याच्या शाळांमधील शिक्षकांना दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करण्याची अट घालण्यात आल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. दोन लसी घेतलेल्या शिक्षकांना परवानगी असताना मग सगळ्यांना सरसकट आरटीपीसीआर चाचणी कशाला असा सवाल शिक्षक विचारत आहेत.
यासंदर्भात पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनीही सवाल उपस्थित केला आहे की, जर लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या शिक्षकांनाच शाळेत प्रवेश आहे तर मग पुन्हा आरटीपीसीआर चाचणी कशासाठी? यावर पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यानी या नियमासंदर्भात चर्चा करून सुधारित आदेश काढला जाईल असे म्हटले आहे.
पुण्यात ज्या नियमांच्या आधारे शाळा सुरू होत आहेत, त्यात पालकांची परवानगी आवश्यक आहे. त्या परवानगीच्या आधारेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल. शाळांनी विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन वर्ग घेण्याची सूचना करण्यात आली आहे. स्वच्छतागृहे दोनवेळा स्वच्छ करण्याचा नियमही घालून देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
एनसीबीच्या ताब्यात बॉलीवूड अभिनेत्याचा मुलगा?
क्रूझवर रंगली पार्टी, भरसमुद्रात एनसीबीची कारवाई
शाळा सुरू झाल्या, महाविद्यालयांचे काय?
प्रख्यात विनोदी लेखक, कथाकथनकार द. मा. मिरासदार कालवश
शाळा जास्तीत जास्त चार तास चालणार आहेत आणि त्यात मधली सुट्टी नसेल. शिवाय मुलांनी येताना पाण्याची बाटली घेऊन यावी पण डबा नको, असा नियमही घालण्यात आलेला आहे.
अन्य राज्यांत शाळा महाविद्यालये सुरू झाली तर महाराष्ट्रात त्याबाबत निर्णय झाला नव्हता अखेर ४ ऑक्टोबरपासून शाळांचे कुलुपे उघडणार आहेत.