कोरोना निर्बंधांत नवे बदल केले असले तरी त्यात लोकल रेल्वेला दूरच ठेवल्यामुळे असंख्य नोकरदारांची चांगलीच कुचंबणा होत आहे. ठाकरे सरकारने रेल्वे प्रवासाला अजूनही मुभा दिली नसल्यामुळे सर्वसामान्यांकडून आता संताप व्यक्त होत आहे.
लोकल रेल्वेअभावी शिक्षकांचेही चांगलेच हाल होऊ लागले आहेत. अनेक मुख्याध्यापकांनी शिक्षकांना शाळेत बोलावले असल्यामुळे, शिक्षकांना पदरमोड करून शाळेत जावे लागत आहे. दुसरीकडे डबेवाल्यांनाही लोकलप्रवेश मुभा नाही. त्यामुळे डबेवाल्यांचे सुद्धा चांगलेच हाल होताहेत. एकीकडे कार्यालये सुरु झाल्यामुळे, डबेवाल्यांचे काम पुन्हा सुरु झाले आहे. मुंबईतील बहुतांशी डबेवाल्यांसाठी सोयीस्कर म्हणून रेल्वेसेवा आहे. परंतु लोकल प्रवास मुभा नसल्यामुळे डबेवाल्यांनाही पायपीट करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
चरितार्थासाठी डबेवाले सायकलच्या माध्यमातून सध्या डबा पोहोचवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. कार्यालये सुरु झाल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला. परंतु वाहतुकीसाठी केवळ लोकलसेवा उत्तम असल्यामुळे मात्र खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
लोकलसेवा सुरु नसल्यामुळे सर्वसामान्यांचे खूपच हाल होत आहेत. मुंबईबाहेरील उपनगरातील लोकांना मुंबईत यायचे झाल्यास, बस किंवा खासगी वाहनांशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे अनेकांना वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. आता विनातिकीट प्रवास करत अनेकांनी सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखवलेली आहे.
कोरोनाकाळात अनेक मुंबईकरांच्या नोकरीवर गदा आली. त्यामुळे हातात मिळेल ते काम करण्यासाठी आता मुंबईकर सरसावलेला आहे. एकीकडे निर्बंधांची टांगती तलवार मुंबईकरांवर सरकारने लादलेली आहे. त्यातच मुंबईची जीवनवाहिनी सर्वसामान्यांना प्रवासासाठी बंद असल्यामुळे रस्तामार्गे कार्यालये गाठताना अनेकांचे हाल होत आहेत. मुंबईमध्ये कार्यांलयांत येण्यासाठी डोंबिवली, ठाणे, कल्याण येथील अनेकांना केवळ रस्त्याशिवाय आता पर्याय नाही.