तब्बल दीड वर्षांनी कालपासून (४ ऑक्टोबर) राज्यभरात शाळा सुरू झाल्या. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सर्व शिक्षकांना उपस्थिती सक्तीची होती. मात्र, अद्यापही शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा न मिळाल्यामुळे शाळेत पोहचताना शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. अनेक शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचारी सोमवारी अक्षरशः दंड भरून शाळेत पोहचले.
अनेक विद्यार्थ्यांवरही पहिल्याच दिवशी दंड भरून आणि विना तिकीट प्रवास करण्याची वेळ आली. शहरांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरणार असूनही इतर शिक्षकांना आवश्यक असल्यास बोलवावे, अशा सूचना असताना सर्व शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात येत असल्यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्याच दिवशी दंड भरून किंवा विना तिकीट प्रवास करावा लागल्याने शासनाने आता रेल्वे प्रवासाला मुभा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
हे ही वाचा:
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!
‘स्वतःच्या मुलाला काही शिकवले नाही, तुमच्या चाहत्यांच्या मुलांना कसे शिकविणार’
…म्हणून व्हाॅट्सॲप, फेसबुक झाले होते बंद
मुंबई महापालिका क्षेत्रात कार्यरत असणारे ७० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पालघर, वसई, विरार, कर्जत, कसारा, नवी- मुंबई भागांमध्ये राहतात. त्या सर्वांनीच लसीचे डोस घेतलेले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली होती, त्यानुसार अनेक जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. सर्वांचेच दोन्ही डोस घेऊन न झाल्यामुळे त्यांना प्रवास करण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाला उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासाचा प्रश्न कसा सोडवणार यासंबंधित स्पष्ट सूचना द्याव्यात अशी मागणी पालकांनी केली आहे.