अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा भारतातील राज्यांना तडाखा बसला आहे. कर्नाटक, गोवा या किनारपट्टी लगतच्या राज्यांना याचा फटका बसला असून महाराष्ट्रातील किनारपट्टी प्रदेशदेखील हाय अलर्टवर आहे.
एकीकडे सारा देश कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतानाच आता त्यात आस्मानी संकटाचीही भर पडली आहे. अरबी समुद्रात आलेले तौक्ते चक्रीवादळ हे भारतातील काही राज्यांना थडकले आहे तर आणखीन काही राज्यांना थडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकात या वादळाने खूप नुकसान केले असून यात ४ जणांना आपलाजीवही गमवावा लागला आहे. कर्नाटक राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार कर्नाटकमधील दक्षिण कन्नडा, उडूपी, उत्तर कन्नडा, कोडागु, शिवमोग्गा, चिकमंगळूरु, आणि हस्सन या सात जिल्ह्यांमधील १३ तालुके आणि ७३ गावांना या वादळाचा फटका बसला आहे. या पैकी शिवमोग्गा, चिकमंगळूरु, उडूपी, उत्तर कन्नडा या चार जिल्ह्यातून प्रत्येक एक याप्रमाणे मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या वादळात ११२ घरे, १३९ खांब, २२ ट्रान्सफॉर्मर्स यांचे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला
अतुल्य भारताचा सन्मान करा, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने मीडियाला सुनावले
अमित शहा- उद्धव ठाकरे तातडीची बैठक, तौक्ते वादळांवर चर्चा
मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना
तर गोव्यात तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसात झाड पडून माणसे जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर राज्यातील अनेक इलेक्ट्रिकचे खांब उखडले गेले असून राज्यातले बहुतांश वीज पुरवठा खंडित झाला आहे.
गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्राच्या काही भागात या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पावसाच्या सरी अनुभवायला मिळाल्या आहेत. तर याच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लसीकरण हे सोमवार, १७ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर १८ मे रोजी हे वादळ गुजरातमध्ये दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गुजरातमधील एकूण १४ जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.