देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. अशातच देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. अशातच आता टाटा समूह विमानाद्वारे परदेशातून ६० क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स भारतात आणणार आहे आणि सुमारे ४०० ऑक्सिजन उत्पादन युनिट्सची स्थापना करणार आहे. या ऑक्सिजनचा वापर लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये केला जाऊ शकतो. टाटा सन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने असेही सांगितले की, ग्रुपच्या विविध कंपन्यांनी एकत्रित येत कोव्हिड रुग्णांसाठी सुमारे ५००० बेड्सची व्यवस्था केली आहे.
टाटा समूह त्यांच्या कर्मचार्यांना, विशेषत: भारतीय हॉटेल्सशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे, जेणेकरुन रुग्णांची काळजी घेण्यासाठी कर्मचार्यांची कमतरता भासू नये. टाटा ग्रुपने आपल्या बऱ्याच हॉटेल्सचं कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये रूपांतर केलं आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष (पायाभूत सुविधा, संरक्षण, एरोस्पेस आणि ग्लोबल कंपनी अफेअर्स विभाग) बनमाली अग्रवाल म्हणाले की, आम्ही दररोज सुमारे ९०० टन ऑक्सिजन उपलब्ध करत आहोत. टाटा स्टील स्वतः हे काम करत आहे. टाटा स्टीलमधील आमच्या लोकांनी वाहतूक ही समस्या असल्याचे ओळखले आहे. तसेच आम्हाला विशेष क्रायोजेनिक कंटेनरची आवश्यकता आहे. क्रायोजेनिक कंटेनर्स भारतात नाहीत. त्यामुळे आम्हाला हे इतर देशांकडून माहिती घेऊन, शोधून विमानाद्वारे हे कंटेनर्स देशात आणावे लागणार आहेत.
हे ही वाचा:
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात ठाकरे सरकार उताणे
देशात ऑक्सिजन पुरवण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न
बंगाल हिंसाचार: संजय राऊतांनी केली ममता बॅनर्जींची पाठराखण
अग्रवाल म्हणाले की, “आम्ही जवळपास ६० कंटेनर्स भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यापैकी सुमारे १४ कंटेनर्स यापूर्वीच भारतात दाखल झाले आहेत. अजून बरेच कंटेनर्स येणं बाकी आहे. यासाठी आम्ही लिंडेसारख्या आमच्या भागीदारांसोबत काम करत आहोत, ज्यांच्याशी आमचा चांगला संबंध आहे. कंटेनर्स आणण्यासाठी हवाई दलाची विमानं उपलब्ध करून दिल्याबद्दल अग्रवाल यांनी सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की कोविड -१९ साथीच्या रोगाची दुसरी लाट अत्यंत गंभीर असून ती अचानक आल्यामुळे चिंता वाढल्या आहेत.