युद्धभूमीवर शौर्य गाजवणारा महापराक्रमी ‘वैजयंता’ रणगाडा शहीद मनीष पितांबरे यांच्या स्मरणार्थ मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आला होता. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी युद्धभूमीवर शौर्य गाजवणारा ‘वैजयंता’ रणगाडा राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांना शहीद मनीष पितांबरे यांच्या शौर्याच्या स्मरणार्थ दिला होता. रंगकाम आणि डागडुजीसाठी हा रणगाडा तिथून काढण्यात आला होता. मात्र, अद्यापही तो पुन्हा त्याच्या जागी ठेवण्यात आलेला नाही. आज तोच रणगाडा रेतीबंदर जवळ कचऱ्यात ठेवण्यात आला आहे.
१९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारा ‘वैजयंता’ रणगाडा १९ मे २०१३ रोजी राष्ट्रवादी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करून मुंब्रा स्थानकाच्या बाहेरील मोकळ्या जागेत बसवण्यात आला होता. काही वर्षे मुंब्र्यातील आकर्षण बनलेला हा रणगाडा दारूच्या बाटल्या, गर्दुल्ले, भिकारी, कचरा आदींच्या विळख्यात सापडला होता. रणगाड्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक ठेवण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, त्यावर पुढे काही झाले नाही.
हे ही वाचा:
‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल
एमओए : मनमर्जी ऑलिम्पिक असोसिएशन
अमेरिकेहून परतल्यावर न थांबता पंतप्रधान मोदींनी इथे का दिली भेट?
लोकल रेल्वे बंद; मग शाळेत जायचे तरी कसे?
रणगाडा १६ ऑगस्ट २०१९ रोजी मुंब्रा स्थानक परिसरातून हटविण्यात आला. रणगाड्याला रंगरंगोटी आणि डागडुजी करून पुन्हा स्थानक परिसरात ठेवण्यात येणार होते. पूर्वीच्या चबुतऱ्याच्या पायऱ्या तोडून हा रणगाडा काचेत बसवण्यात येणार होता. मात्र, हा रणगाडा दोन वर्षे उलटली तरी अजूनही रेतीबंदर परिसरात धूळखात पडला आहे.
२००६ ला श्रीनगर येथील बीजबेहरा भागात हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या फैजल याला मनीष पितांबरे यांनी कंठस्नान घातले होते आणि ते शहीद झाले होते. त्यानंतर त्यांना ‘कीर्ती चक्राने’ गौरविण्यात आले होते. त्यामुळे या रणगाड्यामुळे त्यांच्या स्मृतींना देखील उजाळा मिळत होता. मात्र, रणगाडा पुन्हा त्या जागी ठेवलाच गेला नसल्याने मेजर मनीष पितांबरे यांचा देखील अवमान होत आहे. तेव्हा आमदार असलेले जितेंद्र आव्हाड आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत. त्यांना या ऐतिहासिक ठेव्याचा विसर तर पडला नाही ना? असा प्रश्न ठाणेकर विचारात आहेत.