वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करावा यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांनी सातत्याने फोन करुन दबाव टाकला, असा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला. मुस्लिम मतांसाठी हिंदुत्वाचा त्याग करुन उद्धव ठाकरेंनी बाळसाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. वक्फ बोर्ड सुधारणा विरोधी भूमिका घेतल्याने रझा अकादमी, ऑल इंडिया उलेमा बोर्ड या संघटनांनी जनाब उद्धव ठाकरे यांचे आभार मानले, त्यामुळे उबाठा आता मुस्लिम ह्रदयसम्राट बनले आहेत, अशी खोचक टीका निरुपम यांनी यावेळी केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आजच्या (४ एप्रिल) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार देशभक्त मुस्लिमांच्या हितासाठी आणलेल्या विधेयकाच्या बाजूने उभ राहण्याची बहुतांश उबाठा खासदारांची मानसिकता होती. अरविंद सावंत आणि अनिल देसाई वगळता सर्वच खासदार वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने होते. मात्र, उबाठाकडून या खासदारांना पाच पाच वेळा फोन करुन विरोधात मतदान करण्यासाठी दबाव टाकला, असा खळबळजनक दावा निरुपम यांनी केला. मुस्लिम संघटनांकडून नोटांचे आमिष आणि फंडिंगच्या आश्वासन यामुळे उबाठाने वक्फ विरोधी मतदान केले, असे निरुपम म्हणाले. बाळासाहेब आयुष्यभर हिंदुंच्या हितासाठी लढले, मात्र मतांच्या लाचारीसाठी उबाठाने मुस्लिम तुष्टीकरणाला प्राधान्य दिले, अशी टीका निरुपम यांनी केली.
हे ही वाचा :
मनोज कुमार : अभिनेता, दिग्दर्शक आणि होमिओपॅथीचा डॉक्टरही!
रामनवमी मिरवणुकीला विरोध करणाऱ्या ममतांना फटका, न्यायालयाची परवानगी
सावरकरांवरील विधान नडले, राहुल गांधींची याचिका फेटाळली!
🧘♀️ बदलतोय मौसम, आपणही बदलूया!
मुस्लिम संघटनांनी वक्फ विरोधात भूमिका घेणाऱ्या उबाठाचे जाहीर आभार मानले आहेत. याच संघटनांनी निवडणुकीत उबाठाला फंडिंग केली होती, उबाठाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मशिदीतून फतवे काढण्यात आले होते. त्याची परतफेड वक्फ विधेयकाला विरोध करुन उबाठाने केली, असे निरुपम म्हणाले. अमेरिकेच्या टॅरिफबाबत बोलणाऱ्या उबाठाने मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून ४० टक्के कमिशन खाल्ले आणि मातोश्री २ उभारले त्यांनी टॅरिफवर बोलू नये, असे निरुपम म्हणाले.