अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत करून टी२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी धक्कादायक निकालाची नोंद केली. डल्लास येथील ग्रँड प्रेइरी स्टेडिअमवर हा सामना रंगला. हा सामना सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीचा झाला. अमेरिकेने वारंवार दिलेल्या संधीचे सोने करण्यात पाकिस्तानचा संघ अपयशी ठरला. त्यामुळे ग्रुप ए मध्ये अमेरिकेने भारताच्या वरचे स्थान पटकावले आहे.
पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये ३० धावा केल्या. मात्र मोहम्मद रिझवान, फखर झमान आणि उस्मान खान बाद झाले. बाबर आझमने चांगली सुरुवात केली. बाबर आणि शाबाद खान यांनी चौथ्या विकेटसाठी आठ षटकांत ७२ धावांची भागीदारी केली. त्यामध्ये ४० धावांचा वाटा शादाबचा होता. शादाबने २५ चेंडूंत ४० धावा केल्या. त्यात एक चौकार व तीन षटकारांचा समावेश आहे. ते दोघे ही आघाडी आणखी पुढे नेतील, असे वाटत असतानाच अमेरिकेच्या नोस्थुश केंजिगे याने आपली करामत दाखवली.
या फिरकीपटूने शादाबला बाद केले. नंतर त्याने सूर गमावलेल्या आझम खान याला तंबूत पाठवले. त्याने चार षटकांत ३० धावा देऊन तीन विकेट घेतल्या. शाहीन शाह आफ्रिदी याने काही चांगले फटके लगावल्यामुळे पाकिस्तान सात बाद १५९ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी क्रिकेटपटू सौरभ नेत्रावलकर याने बाबरची फळी उद्ध्वस्त केली. त्याने चार षटकांत केवळ १८ धावा देऊन दोन विकेट पटकावल्या.
हे ही वाचा:
सलग आठव्यांदा आरबीआयचा रेपो रेट जैसे थे स्थितीत
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सफाई कर्मचारी, मजूर, केंद्रीय योजनांचे लाभार्थी उपस्थित राहणार
कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे-भाजपा आमने-सामने नाहीत; मनसेने घेतली माघार
तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकला उतरती कळा; भाजप राज्यातील तिसरी शक्ती म्हणून उदयास येण्याची शक्यता!
अमेरिकेचे फलंदाज चमकले
स्टीव्हन टेलर आणि मोनांक पटेल यांनी पाकिस्तानने ठेवलेल्या लक्ष्यांचा पाठलाग करताना ५.१ षटकातच ३६ धावा केल्या. नसीम शाह याने टेलरला बाद केले. टेलरने १६ चेंडूंत १२ धावा केल्या. त्यानंतर मोनांकने सामन्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. त्याने ३४ चेंडूंत अर्धशतक ठोकले. त्याने अँड्रीस गॉस याच्यासोबत ६८ धावांची भागीदारी रचली. गॉस याने पाच चौकार व एक षटकार खेचून २६ चेंडूंत ३५ धावा केल्या. त्यानंतर हॅरिस रौफ याने त्याला बाद केले. सुपर ओव्हरमध्ये आमिर याने १२ धावा दिल्या. जोन्स याने चौकार लगावला.
नंतर जोन्सने काही एकेरी धावा घेत अमेरिकेने पाकिस्तानपुढे १९ धावांचे लक्ष्य ठेवले. नेत्रावलकरचा पहिला चेंडू निर्धाव होता. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर चौकार लगावण्यात आला. त्याने वाइड दिल्यानंतर तो निराश दिसला. मात्र त्याने इफ्तिकार अहमदची विकेट घेतली. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला सात धावा हव्या होत्या. मात्र शादाब केवळ एक धाव घेऊ शकला. आता पाकिस्तानचा पुढील सामना रविवार, ९ जून रोजी रोहित शर्माच्या भारताशी होणार आहे.