टी २० विश्वचषक स्पर्धा ही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांची शेवटची स्पर्धा असेल, असे स्वतः द्रविड यांनी सोमवारी स्पष्ट केले. या निर्णयाबाबत चर्चा आधीपासूनच सुरू होती. त्यांनी या पदासाठी भारतीय क्रिकेट मंडळाकडे पुन्हा अर्ज केलेला नाही. बीसीसीआयने गेल्याच महिन्यात मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागितले होते.
मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला, असे द्रविड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
‘प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची असते. प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी भारताचा प्रत्येक सामना महत्त्वाचा होता. विश्वचषक स्पर्धाही वेगळी नाही. मुख्य प्रशिक्षक म्हणून ही माझी शेवटची स्पर्धा आहे,’ असे द्रविड यांनी सांगितले. द्रविड यांनी नोव्हेंबर २०२१मध्ये मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हातात घेतली होती. ‘मला हे काम आवडते. ही वेगळी अशी जबाबदारी आहे. या संघासोबत काम करून मला खूप छान वाटले. मात्र आता खूप कामे आहेत आणि जीवनाच्या या वळणावर मला नाही वाटत की मला पुन्हा या पदासाठी अर्ज करायला हवा,’ असे स्पष्टीकरण द्रविड यांनी दिले.
हे ही वाचा:
“गडचिरोली-चिमूरची जागा हरल्यास राजकीय संन्यास घेणार”
लोकसभा २०२४: मुंबईतून पीयूष गोयल, राहुल शेवाळे आघाडीवर
क्रिकेट खेळताना तरुण मैदानावरच कोसळला!
कोल्हापुरात भरधाव कारने सहा जणांना उडवले! तिघे मृत
विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना आयर्लंडविरोधात आहे. या सामन्यापूर्वी द्रविड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘मला माझे काम फार आवडते. ही माझी शेवटची स्पर्धा असली तरी मला फरक पडत नाही. पहिल्या दिवसापासून प्रत्येक सामना माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. माझ्या विचारात भविष्यातही काही बदल होणार नाही,’ असे द्रविड म्हणाले.
राहुल द्रविड यांच्या या स्पष्टीकरणामुळे गौतम गंभीर हे भविष्यातील भारताचे मुख्य प्रशिक्षक असतील, या शक्यतेला बळ मिळाले आहे. मात्र त्यांनी अर्ज केला आहे की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही.
मात्र बीसीसीआयचे सरचिटणीस जय शाह यांनी स्पष्ट केले होते की, वेगवेगळ्या घटकांसाठी म्हणजेच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षक नसतील. त्यामुळे तिन्हींसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध घेतला जाईल. जो साडेतीन वर्षे भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी स्वीकारेल. गौतम गंभीर यांनीही भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणे, मला आवडेल, असे नुकतेच स्पष्ट केले होते.