युरो कप फुटबॉल स्पर्धेत राऊंड ऑफ १६ ला सुरुवात झाली असून या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. नेदरलॅंड्स आणि पोर्तुगालचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता विश्वविजेता असलेला फ्रान्स संघही स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्विझरलँड संघाने फ्रान्सला स्पर्धेबाहेर फेकण्याची किमया केली आहे. पेनल्टी शूट आऊट वर या सामन्याचा निकाल लागला असून यात फ्रान्सचा पराभव झाला आहे.
हे ही वाचा:
स्पेनने पार केले क्रोएशियाचे आव्हान
ट्विटरच्या चुकीला माफी नाही…कार्यकारी संचालकावर गुन्हा
नरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका
बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा
सोमवार, २८ जून रोजी युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ १६ चा सहावा सामना फ्रान्स आणि स्वित्झर्लंड या दोन संघांमध्ये खेळला गेला. सामन्याच्या १५ व्या मिनिटाला स्वित्झर्लंड संघाने गोल नोंदवत १-० अशी आघाडी घेतली. फ्रान्ससाठी हा धोक्याचा इशारा होता. सामन्याच्या पहिल्या हाल्फमध्ये स्वित्झर्लंडने आपली १-० ही आघाडी टिकवून ठेवली. पण दुसऱ्या हाल्फमध्ये फ्रान्सने चांगलीच वापसी केली. करिम बेंझिमा याने ५७ व्या मिनिटाला आणि ५९ व्या मिनिटाला असे अवघ्या दोन मिनिटांत दोन गोल नोंदवत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. तर पॉल पोगबा याने ७५ व्या मिनिटाला गोल करत ही आघाडी वाढवली.
फ्रान्स हा सामना जिंकणार असे वाटत असतानाच स्वित्झर्लंड संघ अधिक आक्रमक झाला आणि सामना पुन्हा त्यांच्या बाजूने झुकला. शेवटच्या दहा मिनिटांत दोन गोल करत स्वित्झर्लंडने ३-३ अशी बरोबरी साधली. पहिल्या ९० मिनिटांच्या वेळेत दोन्ही संघ बरोबरीत असल्यामुळे पुढे अतिरिक्त ३० मिनिटांचा खेळ खेळला गेला. पण यात कोणत्याच संघाला गोल करणे शक्य झाले नाही. त्यामुळे हा सामना पेनल्टी शूट आऊट वर गेला. यावेळी एम्बापे या फ्रेन्च खेळाडूची पेनल्टी अडवत स्विस गोलकीपरने हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला.