स्विगी इस्टामार्टमध्ये डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीने गुरुग्राममध्ये एका फ्लॅटबाहेर असलेल्या शूजची चोरी केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी घडली. रोहित अरोरा या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ ११ एप्रिल रोजी ‘एक्स’वर शेअर केला. हे शूज त्याच्या मित्राचे होते, असा दावा रोहितने केला आहे. स्विगीच्या कस्टमर केअरने तत्काळ रोहितच्या तक्रारीची दखल घेतली असली तरी त्यावर अजून तरी कोणतीही कारवाई केलेली नाही.
डिलिव्हरी करणारी ही व्यक्ती पायऱ्या चढताना आणि फ्लॅटची बेल वाजवताना दिसत आहे. पार्सल दिल्यानंतर त्याने आजूबाजूला पाहिले की कोणीही नाही. त्यानंतर तो स्वतःचा चेहरा टॉवेलने पुसत पायऱ्या उतरून गेला. मात्र तो काही क्षणांतच परत फिरला आणि त्याने फ्लॅटबाहेर ठेवलेली शूजची जोडी टॉवेलमध्ये लपवून पळवली.‘स्विगीच्या माणसाने नुकतेच माझ्या मित्राचे नायकेचे शूज पळवले आणि स्विगी आता त्याचा संपर्क क्रमांकही देत नाही,’ अशी तक्रार रोहितने केली. त्याने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर हजारो जणांनी तो पाहिला आणि लोकांनी त्यावर विविध प्रतिक्रियाही दिल्या. त्यानंतर स्विगी केअरने प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा:
गाईच्या हत्येप्रकरणी नईम कुरेशीला अटक!
ऑनलाइन शेअर ट्रेडिंग फसवणुकीचे रॅकेट उघडकीस!
धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा
विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी; रब्बी, उन्हाळी पिकांचे नुकसान
‘आम्ही आमच्या डिलिव्हरी पार्टनरकडून चांगल्या कृत्याची अपेक्षा करतो. तुम्ही आम्हाला वैयक्तिक मेसेज केल्यास आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकू,’असे कस्टमर केअरने म्हटले आहे. त्यानंतर एका एक्स यूजरने स्विगीला उत्तर दिले आहे. ‘किमान या घटनेची दखल घेऊन त्याला नायके शूजचे पैसे परत करण्याची तसदी घ्यावी. हे शूज अजिबात स्वस्त नाहीत आणि अशा प्रकारे त्याने ते गमवणे योग्य नाही,’ असे या यूजरने म्हटले आहे. तर, रोहितने स्विगी केअरला वैयक्तिकरीत्या मेसेज करूनही त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचा स्क्रीनशॉट टाकला आहे. रोहितने टाकलेला हा चोरीच्या घटनेचा व्हिडीओ आतापर्यंत ८० हजार जणांनी पाहिला आहे.