‘आप’च्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी पुन्हा एकदा आम आदमी पार्टी या आपल्या पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. ‘खोटे जास्त दिवस टिकू शकणार नाही. सत्तेच्या नशेत कोणाला चुकीचे सिद्ध करण्याच्या जोशात असे वागू नका, की जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तुम्ही कुटुंबीयांच्या नजरेला नजर देऊ शकणार नाहीत,’ अशी टीका स्वाती मालीवाल यांनी केली. तुम्ही पसरवलेल्या प्रत्येक खोट्यासाठी तुम्हाला न्यायालयात खेचेन, असेही त्या म्हणाल्या आहेत.
‘दिल्लीचे मंत्री त्यांच्याबद्दल खोटे पसरवत आहेत. ‘आप’चे नेते त्यांच्या गाड्यांच्या नंबरची माहिती ट्वीट करून त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत आहेत. इतकेच नव्हे तर, पक्षाच्या लोकांना फोन करून सांगितले जात आहे की, माझा कोणताही खासगी व्हिडीओ असल्यास पाठवा, जेणेकरून माझी बदनामी करता येईल,’ असा आरोप मालीवाल यांनी केला आहे.
हे ही वाचा:
‘जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळी सापडले पुरातन शिवमंदिर’
कोलकात्याचे न्यायाधीश म्हणाले, रा.स्व. संघाकडून मला देशभक्ती, कटिबद्धता शिकता आली!
स्वाती मालीवाल प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून एसआयटी !
फैजलने हिंदू मुलीला केरळमध्ये नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले!
मालिवाल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून त्यांची बाजू मांडली आहे. ‘दिल्लीचे मंत्री कालपासून खोटे पसरवत आहेत की, माझ्यावर एफआयआर दाखल आहे. त्यामुळे मी भाजपच्या इशाऱ्यावर हे सर्व करते आहे. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की, हा एफआयआर आठ वर्षांपूर्वी २०१६मध्ये दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपराज्यपाल दोघांनी दोनवेळा माझी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. हे प्रकरण पूर्णपणे खोटे आहे. या खटल्याला उच्च न्यायालयाने दीड वर्षांपासून स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने हे मान्य केले आहे की, पैशांचा कोणताही व्यवहार येथे झालेला नाही,’ असे त्यांनी यात नमूद केले आहे.
‘मी बिभव कुमारविरोधात तक्रार देईपर्यंत त्यांच्या मते ‘लेडी सिंघम’ होती आणि आज भाजपची एजंट झाले? संपूर्ण ट्रोल आर्मी माझ्यासाठी कामाला लावली. का तर मी खरे बोलले,’ असा आरोपही मालिवाल यांनी केला.