‘अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्याने माझ्या पोटात मारले, लाथही मारली’

स्वाती मालिवाल यांचा आरोप

‘अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्याने माझ्या पोटात मारले, लाथही मारली’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहकारी बिभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याची पोलिस तक्रार ‘आप’च्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी गुरुवारी केली. बिभवने आपल्याला अनेकदा शारीरिक मारहाण केली, काही वेळ तर त्याने शरीराच्या नाजूक भागांवरही मारहाण केली, असे मालिवाल यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

‘बिभव कुमाने आपल्याला कानशिलात लगावली, लाथ मारली, काठीने मारहाण केली आणि पोटात मारले,’ असे मालिवाल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सोमवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी हा प्रकार घडला. कुमार मालिवाल यांना मारहाण करत असताना त्या सुटकेसाठी आर्जव करत होत्या, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्या केजरीवाल यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्या आणि त्यांनी पोलिसांना फोन केला.

हे ही वाचा:

नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिला समाजाला उद्ध्वस्त करत आहेत

बोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी नेले; ‘चुकून’ जिभेवर शस्त्रक्रिया!

इस्लामवादी हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडतात

“भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला”

सोमवारी हा प्रकार झाला होता. मात्र या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मालिवाल यांच्या तक्रारीनंतर, दिल्ली पोलिसांनी कुमार यांच्याविरुद्ध एका महिलेचा विनयभंग, गुन्हेगारी धमकी आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने मालीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे जबाब नोंदवले. तब्बल चार तास जबाब नोंदवला जात होता.

त्यानंतर मालिवाल यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, असा विश्वास सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला.‘माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं. माझ्यासोबत घडलेल्या घटनेबाबत मी माझे म्हणणे पोलिसांना दिले आहे. मला आशा आहे की योग्य ती कारवाई केली जाईल,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
‘गेले काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्यांचे मी आभार मानते. ज्यांनी चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला, त्या दुसऱ्या पक्षाच्या सूचनेनुसार करत आहेत, अशी टीका ज्यांनी केली, ईश्वर त्यांनाही आनंदी ठेवो,’ असे मालीवाल यांनी म्हटले आहे.

Exit mobile version