स्वस्तिक क्रीडा मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डीच्या प्रथम श्रेणी पुरुषांत पूर्व विभागात सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावले. याच गटाच्या पूर्व विभागात जॉली स्पोर्टस् ने अजिंक्यपद मिळविले. सिद्धार्थ क्रीडा मंडळ, पार्ले स्पोर्टस् हे दोन संघ कुमार गटात अनुक्रमे पूर्व आणि पश्र्चिम विभागाचे विजेते ठरले.
मुंबई उपनगर कबड्डी असो.ने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर – २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले होते.
पूर्व विभाग प्रथम श्रेणीच्या अंतिम सामन्यात स्वस्तिक मंडळाने अमरज्योत संघाचा प्रतिकार २९-२५ असा मोडून काढत हॅट्रीक साधली. स्वस्तिक मंडळाने सुरुवातच झंझावाती करत प्रतिस्पर्ध्यावर दोन लोण देत पूर्वार्धात २३-०६ अशी मोठी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. उत्तरार्धात मात्र अमरज्योत संघाने लोणची परतफेड करीत सामना रंगतदार अवस्थेत नेला.
परंतु स्वस्तिकने संयम राखत ४गुणांनी सामना आपल्या कडे राखला. पूर्वार्धात तुफानी खेळ करणाऱ्या आकाश रूडले, अक्षय बेर्डे यांच्यामुळेच स्वस्तिकला विजेतेपद राखता आले.
उत्तरार्धात सुर सापडलेल्या अमरज्योतच्या संकेत मोरेने स्वस्तिकला चांगलेच जेरीस आणले. पण अन्य सहकाऱ्यांची साथ न लाभल्याने अमर ज्योत संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
याच गटाच्या पश्चिम विभागात जॉली स्पोर्टस् ने गोकुळवन मित्र मंडळाला ४८-१८ असे सहज लोळवित विजेतेपदाचा मान पटकाविला. पहिल्या डावात जॉलीने धडाकेबाज सुरुवात केली. त्यांनी गोकुळवन संघावर ३लोण देत व ३ बोनस गुण मिळवित ३१-०५ अशी आघाडी घेतली. या धक्क्यातून गोकुळवन संघाला सावरणे जमले नाही. आणि ३० गुणांच्या मोठ्या फरकाने जॉली संघाने विजेत्यापदाच्या चषकावर आपले नाव कोरले.
नामदेव इस्वलकर, अभिषेक नर यांच्या चढाई पकडीच्या खेळामुळे हा मोठा विजय शक्य झाला. गोकुळवनच्या अभिषेक बागले, सुमेध सावंत यांचा खेळ या सामन्यात बहरला नाही.
कुमारांच्या पूर्व विभागात सिद्धार्थ क्रीडा मंडळाने ओवाळी मंडळाचा ३३-११ असा सहज पराभव करीत हे जेतेपद पटकावले.
हे ही वाचा:
मध्यतरला १४-०६ अशी आघाडी घेणाऱ्या सिद्धार्थ संघाने त्यानंतर देखील आपल्या खेळाची गती कायम राखत २२ गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. नरेश चव्हाण, संकेत यादव, अमित फाटक यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. ओवळीचा अमन तोमर चमकला.
याच गटाच्या पश्र्चिम विभागाच्या अंतिम सामन्यात पार्ले स्पोर्टस् ने श्री सिद्धिविनायक मंडळाला ४६-२५ असे नमवित जेतेपदाचा चषक आपल्या नावे केला. विश्रांतीला २२-१० अशी आघाडी घेणाऱ्या पार्ले संघाने नंतरच्या खेळात देखील आपला जोश कायम राखत या विजयाला गवसणी घातली. अभिषेक यादव, ईशांत शिंदे यांच्या सर्वांगसुंदर खेळाला या विजयाचे श्रेय जाते. श्री सिद्धिविनायकचे ओम् कुदळे, चंद्रकांत भोसले बरे खेळले.