ब्रिटीश सरकारचे अनुदान मिळत असलेल्या महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकलेले सावरकर हेच पहिले भारतीय विद्यार्थी होत. सार्वजनिक रीतीने परदेशी कपड्यांची प्रचंड होळी करणारे तेच पहिले भारतीय पुढारी होत.ज्या काळात एखाद्याने “राज्य” किंवा “स्वराज्य” हा नुसता शब्द जरी उच्चारला, तरी त्याच्यावर सर्वस्व हानीचे संकट ओढवत असे, त्या काळात “संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य हे भारताचे उद्दिष्ट आहे” असे प्रकटपणे उद्घोषित करणारे सावरकर हेच आद्य राजकीय नेते होत. विशिष्ट राजकीय विचारसरणी व्यक्त केली म्हणून ब्रिटीश सरकारने ‘बारिष्टर’ ही पदवी देण्यास ज्यांना नकार दिला, असे सावरकर हेच पहिले बारिष्टर होत. देशभक्ती दाखवली म्हणून एका भारतीय विद्यापीठाने (मुंबई विद्यापीठ) ज्यांची पदवी काढून घेतली, असे सावरकर हेच पहिले भारतीय पदवीधर होत. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय महत्त्व मिळवून देणारे, सावरकर हेच पहिले भारतीय नेते होत. ज्यांचा ग्रंथ छापण्यापूर्वीच वा प्रकाशित होण्यापूर्वीच दोन राष्ट्रांच्या सरकारांनी तो जप्त करून त्या ग्रंथाला जागतिक साहित्याच्या क्षेत्रात एक अजोड बहुमान मिळवून दिला, असे सावरकर हेच पहिले ग्रंथकार होत. ब्रिटीश न्यायालयाचा अधिकार अमान्य करणारे सावरकर हेच पहिले बंडखोर भारतीय नेते होत. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्यांच्या अटकेच्या प्रश्नावर अटीतटीचे रण माजले, असे सावरकर हेच जगाच्या इतिहासातले पहिले राजकीय बंदिवान होत. जगाच्या संपूर्ण इतिहासात, अर्ध्या शतकाच्या जन्मठेपेची शिक्षा दिले गेलेले, सावरकर हेच पहिले राजकीय बंदिवान होत. कागद – लेखणी ही साधने उपलब्ध नसल्यामुळे कारागृहाच्या भिंतीवर काट्याने वा अणकुचीदार दगडाने कविता लिहून त्या सहस्त्रावधी काव्यपंक्ती वैदिक चिकाटीने स्मृतीगात करून ठेवणारे आणि नंतर इतरांच्या मुखाने त्या कविता भारतात प्रसृत करणारे, सावरकर हेच जगाच्या इतिहासातले पहिले महाकवी होत. मानवजातीच्या उशःकालापासून तो प्रत्यक्ष आजच्या घटकेपर्यंत आर्यांनी आपले पवित्र वेद पिढ्यानपिढ्या मुखगत नि प्रसृत करून कसे अखंड टिकवून ठेवले, याचे एक प्रात्यक्षिकच सावरकरांनी आपल्या या काव्यनिर्मितीने जगाला दाखवून दिले. मेकॉले हा आपल्या अद्भुत स्मरणशक्तीने संपूर्ण डेमोस्थेनीस, संपूर्ण मिल्टन, नि बहुतेक संपूर्ण बायबल तोंडपाठ म्हणून दाखवीत असे. त्या मेकॉलेला सावरकर हे तोडीसतोड प्रतिस्पर्धी असल्याचे आढळून आले असते.
(संदर्भ : धनंजय कीर लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र )
– श्रीकांत पटवर्धन