स्वामी विवेकानंद शाळेने जिंकले विजेतेपद

भागुबाई खिचाडिया (१६ वर्षाखालील) क्रिकेट स्पर्धा

स्वामी विवेकानंद शाळेने जिंकले विजेतेपद

बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेने खार जिमखाना आयोजित भागुबाई खिचाडिया या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी रिझवी स्प्रिंग फील्ड, वांद्रे या शाळेवर ५ विकेट्सनी मात करून विजेतेपदाचा गवसणी घातली. रिझविला १३१ धावांत गुंडाळणाऱ्या स्वामी विवेकानंद शाळेने विजयाचे लक्ष्य केवळ ५ विकेट्स गमावून १८.२ षटकांत पार केले. राष्ट्रीय क्रिकेट निवडसमितीचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

 

स्वामी विवेकानंद शाळेने नाणेफेक जिंकून रिझवीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामन्याच्या पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर बाली मिळविणाऱ्या आदित्य सोनघरे याने आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला पुरते नामोहरम केले. त्याने या लढतीत ४९ धावांत ५ बळी मिळवून रिझवी स्प्रिंगफिल्ड संघाला १३१ धावांतच गुंडाळण्याची करामत केली. त्याला अर्णव लाड याने ४० धावांत ३ बळी मिळवत मोलाची साथ दिली. रिझवीतर्फे कर्णधार देवेश राय यानेच झुंजार फलंदाजी करीत ४८ धावांची खेळी केली. मात्र त्यांच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली.

शुभम पलाई (१६) आणि मीत पटेल (१७) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना स्वामी विवेकानंद शाळेने २९ धावांत २ बळी गमावले होते.मात्र युग असोपा (५४) आणि अद्वैत कांदळकर (४७) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करून प्रतिस्पर्धी संघाच्या आव्हानात हवाच काढून टाकली. केवळ १८.२ षटकांत त्यांनी ५ विकेट्स गमावून विजयी लक्ष्य गाठले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी मानले इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार

माझा पुढचा जन्म बहुधा बंगालमध्ये होईल…

सिसोदिया तुरुंगातच राहणार, न्यायालयीन कोठडीत वाढ!

कोस्टल रोड ते वरळी सी लिंकला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी

 

स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून स्वामी विवेकानंद शाळेच्या युग असोपा (स्पर्धेत १९८ धावा) याला गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज (१२ बळी) आणि सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून रिझवी स्प्रिंगफील्ड शाळेच्या देव दमानिया याला गौरविण्यात आले. खार जिमखान्याच्या अध्यक्ष विवेक देवनानी (पॉली), द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड, एम.सी.ए. कमिटी सदस्य अभय हडप, भागुभाई खिचाडिया स्पर्धेचे चेअरमन इक्बाल भाभा, खार जिमखाना चे सचिव साहिब सिंग लांबा, स्पर्धा सचिव उदय टांक, खार जिमखाना क्रिकेट सचिव सतीश रंगलानी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

संक्षिप्त धावफलक – रिझवी स्प्रिंगफील्ड – ३१.१ षटकांत सर्वबाद १३१ (शुभम पलाई १६, देवेश राय ४८, मीट पटेल १७; आदित्य सोनघरे ४९ धावांत ५ बळी, अर्णव लाड ४० धावांत ३ बळी) पराभूत वि. स्वामी विवेकानंद – १८.२ षटकांत ५ बाद १३२ (अर्जुन लोटलीकर २२, युग असोपा ५४, अद्वैत कांदळकर ४७; आर्यन ७ धावांत २ बळी).

Exit mobile version