हरून अर्शदच्या अखेरच्या षटकांत चार षटकारांसह २६ धावा चोपून काढणाऱ्या सूर्यकुमार यादवमुळे भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँगविरुद्ध १९२ धावा केल्या आणि त्यांच्यावर ४० धावांनी विजय मिळविला.
पाकिस्तानवर मात केल्यानंतर भारताचा हा टी-२० स्पर्धेतील दुसरा सामना होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांत २ बाद १६६ धावा केल्या होत्या. पण २०व्या षटकांत सूर्यकुमार तळपला. त्याने अर्शदला पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार खेचले. पण चौथ्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. मात्र पाचव्या चेंडूवर सूर्यकुमारने आणखी एक षटकार लगावत सर्वांची वाहवा मिळविली. अखेरच्या चेंडूवर २ धावा काढून भारताला २ बाद १९२ धावसंख्येपर्यंत नेण्यात सूर्यकुमारचा मोठा वाटा होता. ते करतानाच त्याने स्वतः २६ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली.
हे ही वाचा:
सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख
बाप्पा आले घरी! सोन्याला झळाळी
बीसीसीआय म्हणजे ‘क्रिकेट की दुकान’
भारतीय विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार ठरला. त्याने ६ षटकार आणि तेवढेच चौकार लगावून आपली ६८ धावांची खेळी सजविली. तोच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला साथ मिळाली ती विराट कोहलीची. विराटने ५९ धावांची खेळी करताना ३ षटकार लगावले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने तर आपल्या ६८ धावांपैकी ६० धावा उभ्या उभ्याच केल्या.
भारताने हाँगकाँगला दिलेले १९३ धावांचे आव्हान त्यांना पेलवले नाही. ४० धावांनी त्यांनी हार मानली.
भारताच्या धावसंख्येला उत्तर देताना हाँगकाँगच्या बाबर हयातने ४१ धावांची सर्वोच्च खेळी केली. तर किंचित शहाने ३० धावा करत त्याला साथ दिली. पण २० षटकांत हाँगकाँगला ५ बाद १५२ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
स्कोअरबोर्ड
भारत २ बाद १९२ (राहुल ३६, रोहित शर्मा २१, विराट कोहली नाबाद ५९, सूर्यकुमार ६८) विजयी वि. हाँगकाँग ५ बाद १५२ (बाबर हयात ४१, किंचित शहा ३०). सामनावीर : सूर्यकुमार यादव