भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेला बुधवार १७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. भारतीय संघाने या मालिकेतील पहिला सामना आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या अर्धशतकी कामगिरीच्या जोरावर भारताने या सामन्यावर विजयी मोहर उमटवली. १६५ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या १९.४ ओव्हर मध्ये पूर्ण करत न्यूझीलंडवर ५ विकेट्सने मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राहुल द्रविड याचा भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच सामना होता. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. विशेष म्हणजे या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरेल मिशेल याला पहिल्याच षटकात शून्यावर बाद करण्यात आले. भुवनेश्वर कुमारने त्याचा त्रिफळा उडवला. पण त्यानंतर मार्टिन गप्टिल आणि युवा खेळाडू चॅपमन यांनी न्यूझीलंडचा खेळ सावरला. या दोघांनीही अर्धशतके झळकावली. या जोरावर न्यूझीलंड संघाने २० षटकांत १६४ धावा केल्या त्या बदल्यात त्यांचे सहा गडी बाद करण्यात भारतीय संघाला यश आले.
हे ही वाचा:
‘एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्ही एक ऐतिहासिक लढा लढत आहात’
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर फरार
मुंबईत हिवसाळा; दक्षिण मुंबईत पावसाने लावली जोरदार हजेरी
मोदी पंतप्रधान झाल्यापासून महिलांची सैन्यातील भूमिका वाढली
१६५ धावांचे विजयी लक्ष ठेवून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार के.एल राहुल यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. पण त्यानंतर लगेचच के.एल. राहुल बाद झाला. पण त्यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादवच्या साथीने कर्णधार रोहित शर्माने आणखीन एक अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. रोहितने ४८ धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने ६२ धावा करत आपले अर्धशतक साजरे केले. त्याच्या याच निर्णायक कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी रांची येथे खेळला जाणार आहे.