मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बूमराहच्या दमदार खेळीमुळे मुंबईने बंगळुरूचा पराभव केला. १९७ धावांचे लक्ष्य मुंबईने अवघ्या १५.३ षटकांत पूर्ण केले आणि हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. इशान किशन (३४ चेंडूंत ६९ धावा), रोहित शर्मा (२४ चेंडूंत ३८ धावा) आणि सूर्यकुमार यादव (१९ चेंडूंत ५२ धावा) यांनी बंगळुरूंच्या गोलंदाजांची पिसे काढली. बंगळुरूचा हा हंगामातील पाचवा पराभव ठरला.
इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना गवसलेला सूर हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. सूर्यकुमारने अवघ्या १७ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजांनी एका दिवसात १५ षटकार आणि १८ चौकार लगावले. म्हणजे १९७ धावांमध्ये १६२ धावा केवळ या चौकार, षटकारांच्या होत्या.
हुर्यो होऊनही हार्दिक डगमगला नाही
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा हुर्यो उडवण्यात आली. मात्र त्याने तिची तमा बाळगली नाही. हार्दिकने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. पांड्याने सहा चेंडूमध्ये २१ धावा केल्या. त्यानंतर या हुर्योचे रूपांतर जल्लोषात झाले.
बंगळुरूची निराशाजनक सुरुवात
हार्दिकने नाणेफेक जिंकून सर्वात प्रथम बंगळुरूला फलंदाजीचे आमंत्रण दिले. कोहली नऊ चेंडूंत अवघ्या तीन धावा करून परतला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विल जॅक्सने सहा चेंडूंत अवघ्या आठ धावा केल्या. आकाश मधवालने त्याला चौथ्या षटकात बाद केले. रजत पाटिदार आणि कर्णधार फाप डु प्लेसिस यांची चांगली जोडी जमली. पाटिदारने २५ चेंडूंत अर्धशतकी मजल मारली. मात्र पाटिदार १२व्या षटकात बाद झाला. फाफ दू प्लेसिस (४० चेंडूंत ६१) आणि दिनेश कार्तिक (२३३ चेंडूंत नाबाद ५३) यांनी दमदार खेळी केली. तर, ग्लेन मॅक्सवेल आणि महिपाल लोमरोर हे दोघेही शून्यावर बाद झाले.
हे ही वाचा:
धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा
राज ठाकरेंनी भूमिका बदलली की, मूळ भूमिकेकडे परतले?
तिकीट मिळाले नसल्याने राजीनामा दिलेल्या निशा बांगरे यांचा पुन्हा नोकरीसाठी अर्ज
गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का, रोहन गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश!
सौरव चौहान याने अवघ्या नऊ धावा केल्या. फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर कार्तिकने एकट्याने धावसंख्या १९६वर पोहोचवली. जसप्रीत बूमरहा हा या दिवसाचा स्टार गोलंदाज ठरला. त्याने अवघ्या २१ धावा देऊन पाच विकेट खिशात घातल्या. मुंबईचे बाकी सारे गोलंदाज महागडे ठरले. आकाश माधवालच्या गोलंदाजीवर ५७ धावा कुटल्या गेल्या. या विजयामुळे मुंबई सातव्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.