आज रामनवमी. तब्बल ५०० वर्षानंतर रामजन्मभूमी आयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य श्री राममंदिरात आज पहिल्यांदाच रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला. रामलल्ल्ला यांच्या मूर्तीवर दुपारी जन्मकाळावेळी सूर्य किरणांचा अभिषेक झाला. रामलल्लांच्या कपाळावर ‘सूर्य तिलक’ पडले. हा क्षण जगभरातील रामभक्तांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. रामनवमीच्या निमित्ताने आयोध्यानगरी सजली असून लाखो भक्त सध्या अयोध्येत दाखल आहेत. मंदिर उभे राहिल्यानंतर आणि प्रभू श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ही पहिलीच रामनवमी होती.
मिरर आणि लेन्सचा समावेश असलेली विस्तृत यंत्रणा या सूर्य तिलकसाठी उभारण्यात आली होती. मंगळवारीच शास्त्रज्ञांनी या प्रणालीची चाचणी घेतली होती. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, केंद्रीय बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या माहितीनुसार हा तिलक आकार हा ५८ मिमीचा आहे. प्रभू रामलल्लांच्या कपाळावर हा प्रकाश असण्याचा काळ हा साधारण तीन ते साडेतीन मिनिटांचा होता.
हेही वाचा..
राहुल गांधी अन प्रियंका हे ‘अमूल बेबीज’!
युपीएससी परीक्षेत बॅडमिंटनपटू कुहू गर्गने मारले मैदान
जॉस बटलरच्या वादळात केकेआर गारद!
राहुल गांधींच्या रामनवमी शुभेच्छांमध्ये प्रभू श्री रामांच्या फोटोचा विसर
प्रभू रामलल्ला यांना सूर्य तिलकांनी अभिषेक होणार होता त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून रामनवमी या सणाच्या शुभेच्छा दिल्या. “भगवान श्रीराम जयंती, रामनवमी निमित्त देशभरातील माझ्या कुटुंबियांना अनंत शुभेच्छा! या शुभ प्रसंगी माझे मन भारावून गेले आणि पूर्ण झाले. या वर्षी लाखो देशबांधवांसह मी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा साक्षीदार झालो ही श्री रामाची परम कृपा आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
अयोध्येत ही रामनवमी अशा प्रकारे साजरी करणे हे देशवासीयांच्या अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येचे, बलिदानाचे फळ असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जय सियावर राम’ च्या जयघोषात पंतप्रधान मोदी म्हणाले, आज रामनवमीचा ऐतिहासिक सोहळा आहे. ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. आता काही मिनिटांनी प्रभू रामाला सूर्य तिलक लावून त्यांची जयंती पवित्र नगरी अयोध्येत राम मंदिरात साजरी केली जाईल. प्राणप्रतिष्ठेच्या दिमाखदार सोहळ्यानंतर रामजन्मभूमी दुसऱ्यांदा भव्य सोहळ्याची साक्षीदार होत आहे. राम मंदिरात ५६ प्रकारचे भोग, प्रसाद आणि पंजिरी अर्पण करून रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे.
रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, उत्सवाची सर्व व्यवस्था ट्रस्टद्वारे केली जात असून रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वत्र सजावट करण्यात आली आहे. प्रभू रामाला पंचामृताने स्नान घालण्यात आले आहे. पिवळे वस्त्र परिधान केले आहे. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र या ट्रस्टने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर मंदिरात रामलल्ला यांचा दिव्य अभिषेक करताना पुजाऱ्यांची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ट्रस्टने यावेळी भगवान रामाच्या दिव्या शृंगारची छायाचित्रे देखील पोस्ट केली आहेत.