आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने २०२३ मध्ये टी- २० क्रिकेट प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूची घोषणा केली आहे. यात भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने बाजी मारली आहे. सलग दुसऱ्यांदा सुर्यकुमार याला सर्वोत्तम टी- २० प्लेअर ऑफ दि इअर म्हणून निवडण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काही दिवसांपूर्वी २०२३च्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचा टी- २० संघ जाहीर केला होता. त्याचे नेतृत्व सूर्यकुमारकडे सोपवण्यात आले होते. आता त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयसीसीच्या २०२३च्या टी- २० मधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार सूर्यकुमार यादवने पटकावला. २०२२ आणि २०२३ अशी सलग दोन वर्ष हा पुरस्कार त्याने जिंकला. सलग दोनवेळा हा पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमारने नामांकित खेळाडू सिकंदर रझा, अल्पेश रामजानी आणि मार्क चॅपमन यांना मागे टाकून हा सन्मान मिळवला.
सूर्यकुमारने १७ डावांमध्ये ४८.८६ च्या सरासरीने आणि १५५.९५ च्या स्ट्राइक रेटने ७३३ धावा केल्या. २०२३ मध्ये तो यूएईचा मोहम्मद वसीम आणि युगांडाचा रॉजर मुकासा यांच्यानंतर २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू होता. यूएईच्या स्टारने २३ सामन्यांत ८६३ धावा केल्या, तर युगांडाच्या खेळाडूने वर्षभरात ३१ सामन्यांत ७३८ धावा केल्या. याशिवाय २०२३ मध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी करत मालिकाही जिंकली.
हे ही वाचा:
‘इंडी’ आघाडी फुटली, लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा ‘एकला चलोचा नारा’!
कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करून जदयू, राजद पक्षांच्या मुद्द्यातील हवा काढली
मागासवर्गीयांसाठी लढणारे, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न
‘राम मंदिर उद्घाटन माझ्यासाठी अध्यात्मिकता; राजकारण नव्हे’
सूर्यकुमार यादव गेल्या वर्षीही एकदिवसीय सामन्यात अनेक संधी संधी मिळाल्या होत्या पण त्याला फार चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मात्र, टी- २० सामन्यात सूर्यकुमार यादव याने त्याच्या तुफान फलंदाजीने स्वतःची अशी वेगळी छाप सोडली आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकत तो टी- २० क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला. आताही त्याची आघाडी दुसऱ्या फलंदाजापेक्षा खूप जास्त आहे.