ताबडतोब आत्मसमर्पण करा, सर्वोच्च न्यायालयाचे आप नेते सत्येंद्र जैन यांना आदेश!

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

ताबडतोब आत्मसमर्पण करा, सर्वोच्च न्यायालयाचे आप नेते सत्येंद्र जैन यांना आदेश!

आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे.सुप्रीम कोर्टाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळलाच नाही तर त्यांना तात्काळ शरण येण्यास सांगितले आहे.आरोग्याच्या कारणास्तव सत्येंद्र जैन हे गेल्यावर्षी मे महिन्यापासून अंतरिम जामिनावर बाहेर आहेत.

न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि पंकज मिथल यांच्या खंडपीठाने अंतरिम जामिनावर बाहेर असलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्याला ‘तात्काळ आत्मसमर्पण’ करण्यास सांगितले.सत्येंद्र जैन यांना मे २०२२ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.गेल्या वर्षी २६ मे २०२३ रोजी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

हे ही वाचा:

कोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सात हजार कोटींची देणगी!

‘निवडणूक रोखे कोणी दिले, माहीत नाही’

अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला अपघात; मालगाडीला धडकून चार डबे रुळावरून घसरले

यानंतर त्यांच्या अंतरिम जामिनात अनेकदा वाढ करण्यात आली होती.आता पुन्हा त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.मात्र, सोमवारी (१८ मार्च) सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली आणि ताबडतोब आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे.तसेच या प्रकरणातील सहआरोपी अंकुश जैन आणि वैभव जैन यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

दरम्यान, सत्येंद्र जैन यांना ईडीने ३० मे २०२२ रोजी शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची लाँड्रिंग केल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर निधीतून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अटक केली होती.बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात आप नेत्याच्या कुटुंबाशी संबंधित ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती तपास संस्थेने जप्त केली होती.या कारवाई नंतर एका महिन्यात त्यांना अटक करण्यात आली.

Exit mobile version