पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी होत असलेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घटनाला विरोध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने कठोर शेरे मारत फेटाळली. आम्ही तुम्हाला दंड करत नाही, ही मेहेरबानी समजा अशा शब्दात न्यायालयाने याचिकाकर्ते व ऍड. सी.आर. जया सुकीन यांना सुनावले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे.के. महेश्वरी आणि पी.एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास आणि ती दाखल करून घेण्यासही नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली.
खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारले की, ही याचिका करण्यामागे तुमचा उद्देश काय? तेव्हा याचिकाकर्ते म्हणाले की, राष्ट्रपती हे प्रमुख असतात. त्यामुळे राष्ट्रपती हे माझे राष्ट्रपती आहेत. तेव्हा खंडपीठ म्हणाले की, तुम्ही अशी याचिका घेऊन न्यायालया का आलेला आहात? आम्ही कलम ३२च्या अंतर्गत ही याचिका स्वीकारण्याची आम्हाला गरज वाटत नाही.
तेव्हा याचिकाकर्त्याने कलम ७९ नुसार संसद म्हणजे राष्ट्रपती आणि दोन सभागृहे असे असल्याचे सांगितले. तेव्हा न्यायाधीश महेश्वरी म्हणाले की, कलम ७९ चा संबंध उद्घाटनाशी कसा काय येतो? तेव्हा याचिकाकर्ता म्हणाला की, राष्ट्रपती हे संसदेचे प्रमुख आहेत तेव्हा त्यांनीच या वास्तूचे उद्घाटन करायला हवे. याचिकाकर्त्याने कलम ८७चा उल्लेखही केला. संसदेचे सत्र हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाद्वारे सुरू होते. त्यावर खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले की, याचा संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाशी काय संबंध आहे?
हे ही वाचा:
इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार?
त्याने तब्बल ९४ हजार एमपीएससी हॉल तिकिटे हॅक केली!
मायावतींचा संसदभवन उद्घाटनाला पाठिंबा; विरोधकांना सुनावले
दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर
याचिकाकर्त्याच्या उद्देश न पटल्याने न्यायाधीशांनी ही याचिकाच स्वीकारली नाही. त्यावर कोणतीही सुनावणीही होणार नाही हे सांगितले. भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, याचिकाकर्त्यांना ही याचिका मागे घेण्याची परवानगी देऊ नये, कारण हे याचिकाकर्ते पुन्हा जाऊन उच्च न्यायालयात याचिका करतील. त्यावर याचिकाकर्त्यांनी सांगितले की आपण उच्च न्यायालयात या मुद्द्यावर जाणार नाही.
जया सुकीन यांनी ही याचिका करत न्यायालयाने या वास्तूचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली होती. सध्या याच सगळ्या मुद्द्यावरून राजकारण होत आहे. विरोधकांनी या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.