दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार रजनीकांत यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. चेन्नई येथील कावेरी हॉस्पिटलमध्ये रजनीकांत यांना ठेवले गेले आहे. गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणी करण्यासाठी रजनीकांत कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. पण तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने रजनीकांत यांना ऍडमिट करून घेतले आहे.
रजनीकांत यांना रुग्णालयात ठेवण्या मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या काही चाचण्या करून ऑपरेशन केले जाणार का? याचीही माहिती समोर आलेली नाही. पण आपल्या लाडक्या थलैवाला हॉस्पिटलमध्ये ठेवले गेल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलेच भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आधी गेल्या वर्षी म्हणजेच २०२० च्या डिसेंबर महिन्यात रजनीकांत यांना हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. त्या वेळी रक्तदाबाच्या त्रासामुळे रजनीकांत यांना ऍडमिट केले गेले होते. त्यांचा रक्तदाब अस्थिर होता.
हे ही वाचा:
झुक्याने केले फेसबुकचे नव्याने बारसे
पाकिस्तानचा जल्लोष करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात बेड्या
पालिकेत ‘भंगार’ रॅकेट; लिलाव करणाऱ्याचा आणि लाभार्थ्याचा पत्ता एकच!
काही दिवसांपूर्वीच रजनीकांत हे राजधानी दिल्लीमध्ये होते. यावेळी त्यांना मानाच्या अशा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारतर्फे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. दिल्ली दरबारी रजनीकांत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद या दोघांचीही भेट घेतली होती.