एकीकडे अभिनेता सनी देओलचा ‘गदर- २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे तर दुसरीकडे सनी देओल ५५ कोटींहून अधिक थकबाकी न भरल्याबद्दल बँक ऑफ बडोदाकडून नोटीस देण्यात आल्याचे वृत्त आहे.
सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने अलीकडेच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.परंतु बँक ऑफ बडोदाने थकबाकीची नोटीस पाठवल्यामुळे अभिनेता सनी देओलसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याचा लिलाव होणार आहे. बँक ऑफ बडोदाने बंगल्याची ई-लिलाव अधिसूचना आज जारी केली आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की सनीची जुहूची मालमत्ता न भरलेल्या थकबाकीच्या वसुलीसाठी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
दिल्लीतील बलात्कारात पतीला पत्नीची साथ !
‘रघुराम राजन राजकीय नेते झाले आहेत’!
अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी राज्याराज्यात बनावट संस्था, विद्यार्थी
आशिया कप संघनिवडीसाठी रोहित शर्मा उपस्थित राहणार
मिळालेल्या माहितीनुसार, सनी देओलने त्याचा बंगला बँकेत गहाण ठेवला होता. त्याऐवजी त्याला ५५ कोटी रुपये बँकेत भरायचे होते. सनीचे वडील आणि अभिनेते धर्मेंद्र यांचे नाव अनुदानकर्ता म्हणून ठेवण्यात आले आहे. मात्र,कर्जाची परतफेड केली नसल्यामुळे येत्या ९ सप्टेंबरला हा लिलाव होणार आहे. सनी देओल यांनी अद्याप यावर भाष्य केलेले नाही.
”गदर – २” चे यश
अनिल शर्मा दिग्दर्शित अभिनेता सनी देओल आणि सहकलाकार अभिनेत्री अमिषा पटेल यांचा ‘गदर -२’चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. सध्या देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन ३३६ कोटी असून लवकरच ३५० कोटींचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर ४०० कोटींचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य आहे.