भारताचे महान क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचा मंगळवारी मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने काळ्या फिती लावून सामना खेळत त्यांना आदरांजली वाहिली होती. त्याबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ‘भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या दिवशी काळ्या फिती लावून आदरांजली वाहिली. हे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी झाले पाहिजे होते. अर्थात न करण्यापेक्षा उशीरा झालेले केव्हाही चांगले,’ अशा शब्दांत गावस्कर यांनी टीका केली.
माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे वडील असणाऱ्या दत्ताजीराव गायकवाड यांनी ११ कसोटी सामन्यांत भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्यामध्ये १९५९च्या इंग्लंड दौऱ्याचाही समावेश होता. बीसीसीआयने त्यांच्या मृत्यूबाबत खेद व्यक्त केला असला तरी भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हातावर काळ्या फिती बांधण्याकरिता तिसरा दिवस उजाडण्याची वाट पाहिली. याबाबत गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या एकता आणि बंधुत्वाच्या प्रतीकाचे उदाहरणही दिले.
‘ऑस्ट्रेलियन संघातील कोणत्याही खेळाडूच्या नातेवाइकाचे जरी निधन झाले तर संपूर्ण संघ त्याच्या सहकाऱ्याप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी हातावर काळ्या फिती लावतो. ही एकजूटता अभूतपूर्व आहे आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघाची एकी आपल्याला दिसते,’ असे गावस्कर यांनी त्यांच्या मिडडे वृत्तपत्रातील स्तंभात नमूद केले आहे.
हे ही वाचा:
पुणे पोलिसांकडून ४ हजार कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा
कॉंग्रेसच्या अल्पसख्यांक विभागाला सर्वाधिक देणगी
७० वर्षांपूर्वीची अपुरी स्वप्ने मोदी पूर्ण करणार!
दत्ताजीराव यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. आंतरराष्ट्रीय सामन्यांत फारशी चमकदार खेळी करू शकले नसले तरी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी अव्वल होती. त्यांनी ११० सामन्यात पाच हजार धावा केल्या होत्या. सुरुवातीला बॉम्बे युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधीत्व करणारे दत्ताजीराव नंतर बडोदाला गेले. तिथे त्यांनी संघाला १९५७-५८ची पहिली रणजी ट्रॉफी मिळवून दिली होती.