सलामीवीर या नात्याने मला इथे प्रथम येणे आवश्यक होते आणि त्यासाठी मी इथे आलो. मी आज जो कुणी आहे, त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला मदतीचा हात दिलेला आहे. मी भारतासाठी खेळत असतानाही मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला साथ दिली आहे. मला इथे बोलावल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, अशा शब्दांत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. १२ जानेवारीला मुंबईच्या माजी कर्णधारांचा सत्कार एमसीएच्या वतीने झाला. त्यावेळी गावस्कर बोलत होते.
वानखेडे स्टेडियमचा सुवर्णमहोत्सव सध्या साजरा होत असून पुढील आठवडाभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव साजरा होईल. रविवारी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन यांच्यातील प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईच्या कर्णधारांचा सत्कार समारंभ पार पडला.
गावस्कर म्हणाले की, भारतीय क्रिकेटला ज्या स्थळाने खूप काही दिले आहे. त्यामुळे अशा वानखेडेवर उपस्थित राहिलो याचा मला सार्थ अभिमान आहे. याच स्टेडियमवर आपण २०११मध्ये विश्वचषकही जिंकला. त्यामुळे या स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवात सामील होण्याचा आनंद वेगळा आहे.
या सुवर्णमहोत्सवानिमित्त १९ जानेवारीला भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असो.चे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव अभय हडप यांच्या सह सगळ्या कार्यकारिणीच्या वतीने मुंबईच्या सर्व माजी कर्णधारांचा सत्कार करण्यात आला.
हे ही वाचा:
विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्व विक्रम मोडले!
राजमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती उत्साहात साजरी
मुख्यमंत्री योगींचा शिरच्छेद करण्याची धमकी देणाऱ्या मेहजान उर्फ़ फैज़ला अटक!
प्रयागराजचा महाकुंभ: भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा एक उत्साही संगम!
गावस्कर म्हणाले की, मला आठवते की मी याचठिकाणी पहिल्या २०० धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ती कामगिरी मी केली होती. त्यानंतर मी अनेक शतके देशासाठी झळकाविली. जर कुणाला भारतासाठी माझ्याप्रमाणे किंवा सचिन तेंडुलकरप्रमाणे खेळायचे असेल तर तुम्हाला खूप कष्ट उपसावे लागतील. कारण आम्ही लहानपणापासून ती मेहनत घेत आलो आहोत.
यावेळी मुंबईचे माजी कर्णधार म्हणून सुनील गावस्कर यांच्यासह मिलिंद रेगे, संजय मांजरेकर, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, वासिम जाफर, धवल कुलकर्णी, नीलेश कुलकर्णी, राजू कुलकर्णी, पृथ्वी साव यांचाही सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे विनोद कांबळीही यावेळी खास आला होता. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातूनही त्याने वानखेडेवर हजेरी लावली.
यावेळी सुनील गावस्कर यांनी विनोदची खास भेट घेतली. त्याच्याशी संवाद साधला. त्याची विचारपूस केली. त्याच्या गालावर प्रेमाने चापट मारत त्याच्या पाठीवरही थाप मारली. पृथ्वी साव याच्याशीही गावस्कर यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला. पृथ्वीचा खेळ सध्या घसरलेला आहे. अशा परिस्थितीत गावस्कर यांनी त्याला काही सूचना केल्या असाव्यात असे दिसत होते.