राज्यातील सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्युंमुळे खळबळ उडालेली असताना या प्रकरणी उच्च न्यायालयात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गुरुवार, ५ ऑक्टोबर रोजी तातडीची सुनावणी होणार आहे. न्यायालयाने स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सुमोटो याचिका दाखल केली आहे.
नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दोन दिवसांत सरकारी रुग्णालयात ४१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर न्यायालयात सुनावणी लावण्यात आली असून महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करा, असे आदेश देण्यात आले आहेत.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही अशीच घटना घडली होती. नांदेड प्रकरणात राज्य सरकारने चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन आणि हसन मुश्रीफ यांनी या रुग्णालयाला भेट देखील दिली होती.
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात दोन अर्भकांसह १० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्याने खळबळ उडाली होती. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ठाण्यातील सरकारी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
नेमबाजीने दिली सर्वाधिक सुवर्णपदके
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा अमृतकाल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या खंडाचे मंत्रालयात प्रकाशन!
२०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया शरद पवारांचीच
नांदेडमधील घटना सरकारने गांभीर्याने घेतली असून त्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. नांदेडमधील घटनेवर राज्याच्या मंत्रिमंडळातही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच नांदेडच्या घटनेची चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी देखील या घटनेची दखल घेत रुग्णालय प्रशासनाला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर न्यायालयानेही याची दखल घेतल्याने या प्रकरणी जलद कारवाई होण्याची शक्यता आहे.