उन्हाळ्यामध्ये उन्हापासून त्रास होऊ नये, यासाठी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. अनेकदा जास्त उन्हात चालल्याने, प्रवास केल्याने चक्कर येते. उष्माघाताचा त्रास होतो. या पार्श्वभूमीवर उन्हाळा लागताच आपल्या दिनचर्येत बदल करणे, आहारात बदल करणे आवश्यक आहे. स्वतःची काळजी स्वतःच घेणे हाच यावरचा उपाय आहे.
त्यामुळे उन्हाळ्यात नेमकी काय काळजी घ्यायची ते आपण पाहू. घरची काही कामे असतील तर ति शक्यतो सकाळच्या वेळेत आटोपून घ्यावीत. वयस्कर लोकांनी याला जास्त प्राधान्य देण्याची गरज आहे. कारण साधारण ११ ते सायंकाळी ४, ४.३० पर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते. बाहेर पडताना आपल्याजवळ काहीतरी गोडाचा पदार्थ किंवा एखादे चॉकलेट जवळ ठेवावे. डोळ्यांवर गॉगल्स आणि डोक्यावर टोपी वापरावी.
हेही वाचा..
बांगलादेशात कट्टरवाद्यांकडून दुर्गा मातेच्या मूर्तींची तोडफोड!
मुंबईत १३ महिन्यांत ६५ लाख वाहन चालकांनी नियम मोडले
“गव्हाच्या शेतात आढळणारे ‘पित्तपापडा’ गवत – एक आयुर्वेदिक वरदान”
आपल्या आहारात सुद्धा बदल करणे आवश्यक आहे. गहू, जुने तांदूळ, मूग या धान्यांचा आहारात समावेश करावा. नवीन धान्य कफ वाढवतात तसेच पचनशक्ती कमी करतात म्हणून त्यांचा रोजच्या आहारात समावेश करू नये. नाईलाजाने नवीन धान्य खावे लागल्यास ते धान्य आधी भाजून घ्यावे. जेणेकरून ते पचनास हलकी होतात. याशिवाय डाळिंबाचे सरबत, लिंबू सरबत, उसाच्या रसाचे सेवन करावे. नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोकम सरबत घेतले तरी चालेल. शक्यतो फ्रिजमधील पाणी न पिता डेरा किंवा माठ यातील पाणी प्यावे.
रोजचा व्यायाम करावा मात्र तो हलका असावा. अतिश्रमाचा व्यायाम टाळावा. दिवसा झोपू नये. हलकी आणि पातळ वस्त्रे परिधान करावेत. असे काही बदल केल्यास तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही.