मराठा आरक्षणासाठी एकीकडे लढा सुरू असून आतापर्यंत राज्यातील विविध भागातील तीन मराठा युवकांनी आत्महत्या केली आहे. दुसरीकडे धनगर समाजाकडूनही आरक्षणाची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कुणीकोनूर येथील आबाचीवाडी येथे धनगर आरक्षणासाठी बिरुदेव वसंत खर्जे (वय ३८) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
बिरुदेव यांनी शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात झाली आहे. बिरुदेव यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये आपण धनगर आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवित असून याबद्दल नातेवाईकांना त्रास देऊ नये, असा मजकूर लिहिला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.
रविवारी आरेवाडी येथे दसरा मेळावा झाला. बिरुदेव खर्जेने मेळावा घरात बसून मोबाईलवर पाहिला. त्यानंतर काही वेळाने तो घरातून शेताकडे निघून गेला. बिरुदेवची मुलगी शेताकडे पाण्याची मोटार बंद करण्यास निघाली होती. तिने बिरुदेवचा मृतदेह झाडावर पाहिला आणि ही घटना घरच्यांना सांगितली.
हे ही वाचा:
भटक्या कुत्र्यांमुळे डोक्याला इजा होऊन ‘वाघ बकरी चहा’चे संचालक पराग देसाई यांचा मृत्यू
कर्नाटकमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी मुस्लीम विद्यार्थींनीना हिजाब घालण्यास काँग्रेस सरकारची परवानगी
गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली
एकीकडे सांगलीतील आरेवाडी येथे धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा पार पडत असताना दुसऱ्या बाजूला या तरुणाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.