सिक्कीममध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शंभरहून अधिक घरांची पडझड झाली आहे. भूस्खलनामुळे राज्यातील अनेक रस्ते आणि पुलांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ईशान्य भारतात पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सिक्कीममध्ये सोपखा आणि दोन पूल जोडणारा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. जवळपासचे मासे आणि पोल्ट्री फार्मही वाहून गेले आहेत. तसेच डांटम ते पेलिंग, ग्यालशिंग यांना जोडणारा रस्ता काळज नदीत वाहून गेला. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने एक मातीचे घर, एक सिमेंटची इमारत, दोन स्मशानभूमी आणि एक खोदकाम वाहून गेले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
रामम नदीतील पाण्यामुळे पश्चिम बंगालला जोडणाऱ्या सीमावर्ती भागातील सर्व तात्पुरत्या पुलांचे नुकसान झाले आहे. लाचेन, लाचुंग आणि चुंगथांग खोऱ्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगनच्या उत्तर सिक्कीम जिल्हा मुख्यालयातून चुंगथांगकडे जाणारा रस्ता वाहून गेला, त्यामुळे वाहतूक थांबवावी लागली.
दुसरीकडे, चुंगथांगमध्ये अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम भारतीय सैन्याने केले असून आतापर्यंत सुमारे ३०० पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यासोबतच त्रिशक्ती कॉर्प्स, भारतीय लष्कर आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) तुकड्या या कार्यात उतरल्या असून मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानात पर्यटकांना वाचवण्यासाठी पूरग्रस्त ठिकाणी तात्पुरती क्रॉसिंग तयार करण्यासाठी रात्रभर काम केले.
हे ही वाचा:
‘रॉ’च्या प्रमुखपदी रवी सिन्हा यांची नियुक्ती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम शाखा करणार समान नागरी कायद्याचा प्रसार
‘डाकू हसिना’ला आवरला नाही १० रुपयांच्या फ्रुटीचा मोह अन्…
अमेरिकेच्या व्हॉट्सऍप निर्बंधांमुळे तालिबानी सरकार चालवणे बनले मुश्किल!
परिसरात तंबू उभारण्यात येत असून वैद्यकीय मदतीसाठी चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. सिंगताम, डिक्चू, रंगरान, मंगन आणि चुंगथांग यांना जोडणाऱ्या रस्त्याला भूस्खलनाचा मोठा फटका बसला आहे. डिक्चू ते गंगटोक मार्गे राकडुंग-टिनटेक मार्ग फक्त हलक्या वाहनांसाठी खुला आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या माहितीसाठी स्थानिक प्रशासनाने ८५०९८२२९९७ हा हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे.