देशात साजरी झाली दिवाळी!

चांद्रयान, विक्रम लँडर यशस्वीरित्या उतरले

देशात साजरी झाली दिवाळी!

 

अवघ्या देशाचे लक्ष २३ ऑगस्टला चंद्राकडे लागून राहिले होते. भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान ३ ही मोहीम कशी यशस्वी होते आहे हे प्रत्येकाला डोळे भरून पाहायचे होते. संध्याकाळी ६ वाजता तो ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरांनी लिहिता येईल असा क्षण आला. विक्रम लँडर हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाजवळ आले आणि एकेक किलोमीटरचे अंतर कमी होऊ लागले. तसतशी प्रत्येकाची धडधड वाढली. शेवटी ते चंद्राच्या पृष्ठभागावर लँड झाले तेव्हा किलोमीटरचे आकडे शून्य दाखवू लागले. इस्रोच्या मुख्यालयात टाळ्यांचा गजर सुरू झाला. केवळ तिथेच नव्हे तर संपूर्ण भारतात घऱाघरात लोक चांद्रयानाच्या या यशस्वी लँडिंगने आनंदसागरात डुंबून निघाले. देशभरात जणू दिवाळीच साजरी झाली. दिवाळीला दोन महिने आहेत पण देशात दिवाळीचा जणू सण आल्यासारखे वातावरण होते.

 

मिठाईचे वाटप, ढोलताशे, फटाके यांनी अवघा परिसर दुमदुमून गेला. एखादा क्रिकेटचा सामना जिंकल्याप्रमाणे लोक रस्त्यांवर उतरून आनंद साजरा करत होते. तिकडे इस्रोच्या ट्विटरवरील मिशन पूर्ण झाल्याच्या मेसेजला तासाभरातच एक कोटी लोकांनी प्रतिसाद दिला. दुपारीच इस्रोने ट्विट करत ही चांद्रयानाच्या विक्रम लँडरच्या लँडिंगची प्रक्रिया ५.४४ ला सुरू होईल असे जाहीर केले आणि सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढली. अखेर तो क्षण आला आणि हळूहळू चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागाकडे झेपावले. प्रत्येकाच्या नजरा त्या कमी होत असलेल्या अंतराकडे होत्या. अखेर ते यान लँड झाले. दोन तासांनी त्याने चंद्रावरील फोटोही पाठवले.

 

 

भारताच्या चांद्रयान- ३ या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या यशासह भारताने इतिहास रचत अंतराळ क्षेत्रात नवा टप्पा गाठला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश ठरला आहे. गेल्या ४० दिवसांपासून चांद्रयान मोहिमेची चर्चा होती. अखेर बुधवार, २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजून ४ मिनिटांनी हे यान चंद्रावर उतरले.

 

हे ही वाचा:

इटलीत नोकरी देतो सांगितले; पण लिबियात सशस्त्र गटाच्या तावडीत सापडले

गुजरातच्या तुरुंगात कैद्यांना आणि हिऱ्यांना पाडले जातात पैलू!

प्रज्ञानंद- कार्लसन पहिला डाव बरोबरीत

आठ कोटीच्या चिंधी घोटाळ्याचे धागेदोरेही कलानगरकडे बोट दाखवतायत…

 

चांद्रयान- ३ ला ४ वाजून ५० मिनिटांनी अंतिम कमांड देण्यात आली. त्यामुळे हे यान बुधवारीच चंद्रावर उतरणार हे निश्चित झाले होते. त्यानंतर ५ वाजून ४५ मिनिटांनी लँडिंग प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर ठीक ६ वाजून ४ मिनिटांनी यानाने चंद्राच्या पार्श्वभूमीला स्पर्श केला.

 

पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान- ३ ४० दिवसांनी चंद्रावर पोहचले. चांद्रयान- ३ ने १४ जुलै २०२३ या दिवशी आपल्या चंद्राकडे जाणाऱ्या प्रवासाला सुरुवात केली होती. आंध्रप्रदेशातील श्री हरिकोटा येथून यानाने यशस्वी उड्डाण केले होते. भारताचे चांद्रयान- ३ हे कमी खर्चात चंद्रावर पोहचले. यासाठी इस्रोने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर केला. या प्रक्रियेत इंधनाची बचत होते, मात्र त्यासाठी जास्त वेळ लागतो.

 

रशियाची लुना- २५ ही मोहीम अयशस्वी झाल्यानंतर भारताच्या चांद्रयान- ३ कडे साऱ्या जगाचे लक्ष होते. अखेर भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेला यश आले आहे. ही मोहीम पार पडत असताना अनेक यशस्वी टप्पे यानाने पार पाडले. सर्वात आव्हानात्मक टप्पा होता तो म्हणजे शेवटच्या १५ मिनिटांचा. यानाचा वेग कमी करण्याचे कठीण काम या काळात करायचे होते. हा टप्पाही इस्रोकडून यशस्वीपणे पार करण्यात आला आहे.

 

आता पुढच्या १४ दिवसांत चंद्रावर संशोधनास सुरुवात केली जाणार आहे. चंद्रावर पाणी आहे का? पाण्याचे काही अंश आढळतात का? याचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठमोठे डोंगर-खड्डे असून या भागात सूर्याची किरणे तिरपी पडतात. त्यामुळे बहुतांश भागामध्ये अंधार असतो. यातील अनेक खड्डे अब्जावधी वर्षापासून अंधारात आहेत. कायम अंधार असल्यामुळे हा भाग प्रचंड थंड आहे. शिबाय दुर्लक्षितही आहे. -२०३ डिग्री सेल्सियस इतकं इथलं तापमान आहे. या भागात पाणी आणि खनिज सापडण्याची शक्यता अधिक आहे. खगोलीय संशोधनाच्या दृष्टीने हा भाग महत्वाचा आहे. त्याचमुळे दक्षिण धृवावर पोहचण्यासाठी अनेक देशांमध्ये स्पर्धा सुरू होती. अखेर या स्पर्धेत भारताने बाजी मारत नवा विक्रम रचला आहे.

 

चांद्रयान- २ च्या अपयशानंतर या मोहिमेची अधिक तयारीनिशी आखणी करण्यात आली होती. २०१९ मध्ये चांद्रयान- २ ने जवळपास यश काबीज केलं होतं पण चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना लॅण्डर मॉड्यूलमधल्या तांत्रिक बिघाडामुळे लॅण्डर क्रॅश झालं आणि मोहीम फसली होती. मात्र, या सर्व गोष्टींचा विचार करून ही मोहीम नव्याने आखण्यात आली होती.

Exit mobile version